नातलगाच्या शस्त्रक्रियेप्रसंगी रक्ताची गरज असणाऱ्या प्रवाशांच्या मदतीला गणेश वेमुलकर हा ऑटोरिक्षा चालक फेसबुक फ्रेंड सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांच्या साथीने धावून गेल्याची घटना नुकतीच घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, महांतेशनगर येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या एका रुग्णावर दुसऱ्या दिवशी सकाळी तातडीची शस्त्रक्रिया होणार होती.
या रुग्णाचे नातलग गणेश वेमुलकर या ऑटोरिक्षा चालकाच्या रिक्षातून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्या रुग्णाच्या शस्त्रक्रियेचा विषय निघाला. त्यावेळी संबंधित प्रवाशांनी शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताची गरज लागणार असल्यामुळे गणेश याच्याकडे मदतीची अपेक्षा केली.
तेंव्हा गणेश याने फेसबुक फ्रेंड सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांच्याशी तात्काळ संपर्क साधून माहिती दिली. दरेकर यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गणेशला आपल्या घरातील स्वतःचे ब्लड डोनेशन कार्ड देऊ केले आणि त्या रुग्णाची रक्ताची गरज भागविली. ऑटोरिक्षा चालक गणेश वेमुलकर याने प्रसंगावधान राखून केलेल्या सहाय्यामुळे संबंधित रुग्णाची शस्त्रक्रिया यशस्वी होऊन त्याचे प्राण वाचल्याचे समजते.