राज्यात पुन्हा कोरोना प्रादुर्भावाचा स्फोट झाला असून बेळगाव जिल्ह्यात नव्याने 38 जण कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य खात्याची डोकेदुखी वाढली आहे. राज्यात आत्तापर्यंत आढळलेल्या रुग्णांपैकी 90 टक्के रुग्ण हे परराज्यातील असून बेळगावात आज आढळले सर्व 38 रूग्ण “महाराष्ट्र रिटर्न” आहेत. राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज शनिवार दि. 6 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 239 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत.
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि. 6 जून सायंकाळी 5 वाजल्यापासून आज रविवार दि. 7 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नव्याने 239 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 5,452 इतकी झाली आहे. नव्याने आढळून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये 9 आंतरराष्ट्रीय, तर 183 आंतरराज्य प्रवाशांचा समावेश आहे.
राज्यात रविवारी 143 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 2,132 इतकी झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 3,257 असून यापैकी 10 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी दोघा जणांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 61 इतकी वाढली आहे. यापैकी दोघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.
दरम्यान, बेळगाव जिल्ह्यात काल शनिवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून नव्याने 38 जण कोरोनाग्रस्त आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्येने 300 चा टप्पा ओलांडला आहे. नव्या रुग्णांमुळे बेळगाव जिल्हा प्रशासनासह आरोग्य खात्याची डोकेदुखी आणखी वाढली आहे. कारण गेल्या पांच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत.
यापूर्वी गेल्या सहा दिवसांमध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये एकदा 51, एकदा 12, एकदा 34 आता 38 असे रुग्ण आढळून आल्यामुळे फक्त या सहा दिवसातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जवळपास 150 झाली आहे. यापैकी बहुतांश जण महाराष्ट्रातून आलेले असून आज रविवारी आढळून आले सर्वच्या सर्व 38 कोरोनाबाधित रुग्ण हे “महाराष्ट्र रिटर्न” आहेत. 38 पैकी 4 रुग्ण वडगांव 4 रुग्ण हुक्केरी तर अन्य 30 जिल्ह्यातील इतर रुग्ण असू शकतात.