प्रादेशिक असमतोल दूर करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गेल्या 3 जून रोजी बेळगावातील राज्यस्तरीय कार्यालये महिन्याभरात सुवर्ण विधानसौधमध्ये हलविण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आज मंगळवार दि. 30 जून रोजी तशा 24 कार्यालयांची यादी तयार करण्यात आली असून नव्या आदेशानुसार त्यांचे बेळगावच्या सुवर्ण विधानसौधमध्ये स्थलांतर केले जाणार आहे.
पर्यटन खात्याच्या उपसंचालकांच्या कार्यालयासह जिल्हा उद्योग विनिमय खात्याचे कार्यालय, शहरी आणि ग्रामीण योजना खात्याच्या सहाय्यक संचालकांचे कार्यालय, देवराज अर्स मागासवर्ग विकास निगम, कर्नाटक विश्वकर्म समुदाय विकास निगम उपायुक्त वगैरे विविध निगमांची कार्यालये, कर्नाटक माहिती आयोग बेळगाव तसेच जलसिंचन महामंडळाचे धारवाड विभाग कार्यालय आदी कार्यालयांचा नव्या जागी स्थलांतरीत केल्या जाणाऱ्या कार्यालयांमध्ये समावेश आहे.
राजकीय अधिवेशनाचा कालावधी वगळता बेळगावातील सुवर्ण विधानसौधची इमारत उर्वरित काळात धूळखात पडून असते. तेंव्हा सुवर्ण विधानसौध इमारतीचा वापर सरकारी कार्यालयांसाठी करावा, अशी उत्तर कर्नाटकातील जनतेची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती. स्थलांतरीत करण्यात येणार्या कार्यालय यांची नांवे निश्चित झाल्यामुळे जनतेची ही मागणी आता पूर्ण होणार आहे.