मागील वर्षाप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यात शेत पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी जि. पं. शिक्षण व आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी स्वखर्चाने रविवारी येळ्ळूर येथील नाल्याची सफाई करून दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे येळ्ळूर (ता. बेळगाव) येथील गावातून शेतवडीत जाणारा नाला फुठून आसपासच्या शेतांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. सदर नाल्याची वेळच्या वेळी सफाई केली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ माती साचून तो फुटल्याचे जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच या नाल्याच्या सफाईसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
तथापि अद्यापपर्यंत या मागणीची पूर्तता झालेली नाही. यात भर म्हणून आता कोरोनाची दहशत आणि लॉक डाऊन सुरू असल्यामुळे शासनाकडून मदतीची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे पावसाळा जवळ येत चालला आहे हे लक्षात घेऊन रमेश गोरल यांनी स्वखर्चातून रविवारी येळ्ळूर येथील नाल्याची सफाई करून घेतली. यावेळी नाल्यामधील गाळ काढण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला. गोरल यांनी जातीने उपस्थित राहून सदर नाल्याची सफाई करून दिल्यामुळे येळ्ळूर येथील नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.