कर्नाटक सरकारने सर्व प्रकारच्या शाळा दोन सत्रांमध्ये भरवण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी 7:50 ते दुपारी बारा वीस आणि दुपारी बारा वीस ते सायंकाळी पाच या दोन सत्रांमध्ये शाळा भरली जाणार आहे. सकाळच्या सत्रात 7:50 ते 8 प्रार्थना होणार असून त्यानंतर दुपारपर्यंत अभ्यासाचे तास होणार आहेत तर दुपारच्या सत्रात 12:20 ला प्रार्थना होणार असून त्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत अभ्यासाचे तास होणार आहेत.
शाळा कधीपासून सुरू होणार हे कर्नाटक सरकारने अद्याप जाहीर केलेले नाही. कोरोणाच्या संकटामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना सुट्टी मिळाली मात्र घरात कोंडून राहावे लागले. नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार हा प्रश्न आहे. ते कसे सुरु होणार याचे स्पष्टीकरण कर्नाटक सरकारने दिले असून दोन सत्रांमध्ये वेगवेगळे वर्ग भरवून अभ्यास पूर्ण करण्याचा निर्णय उर्वरित काळात कर्नाटक सरकारच्या शिक्षण खात्याने घेतला आहे. सरकारने लवकरात लवकर शाळा सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या असल्या तरी रेड आणि कंटेनमेंट झोन मधील मुलांचे नेमके काय होणार? त्यांना शाळेला जाता येणार का? ज्या भागात कोरोना रुग्ण पॉझिटिव आढळतील अशा भागातील मुलांच्या शाळेची एकंदर परिस्थिती कशी असेल?
ज्यांच्या घरातच कोरोना पॉझिटिव आढळले आहेत त्यांना शाळेला येता येईल का? या आणि इतर अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.कर्नाटक सरकारने लवकरात लवकर शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असल्या तरी अनेक प्रश्नांची उत्तरे अजून कर्नाटक सरकारला शोधावी लागणार आहेत. त्यानंतर शाळा कधी सुरू होणार हे स्पष्ट होईल.