सहा महिन्यांपासून एपीएमसीमध्ये काही रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. कांदा मार्केट बटाटा मार्केटमध्ये पाण्यासाठी ठणठणाट आहे. त्यामुळे एपीएमसीमध्ये कोणी पाणी देता का पाणी असाच प्रश्न व्यापारी व हमाल करत आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ आणि कर्नाटकातील सर्वात मोठी उलाढाल करणारी बाजारपेठ म्हणून एपीएमसी कडे पाहिले जाते. मात्र सध्या या एपीएमसी मार्केटमध्ये प्रशासनाकडूनच टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तो देखील वेळेत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.

अशा परिस्थितीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन कोणत्या हालचाली करत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. व्यापार्यांनी आणि तेथील हमालानीही याबाबत प्रशासनाला कळविले असता लवकरच करू असे आश्वासन देऊन त्यांची दिशाभूल करण्यात धन्यता मांडण्यात येत आहे. त्यामुळे एपीएमसीमध्ये पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एपीएमसीमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या भाजीमार्केट सध्या बंद असले तरी ते सुरू झाल्यानंतर पाण्यासाठी पुन्हा मोठे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे एपीएमसी येथील पाईपलाईन दुरुस्त करून तेथील व्यापारी व हमालांना पाणीपुरवठा योग्य प्रमाणात करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. एपीएमसीमध्ये रताळी मार्केटमध्ये व तसेच इतर ठिकाणी प्लास्टिक टॅंक बसविण्यात आले आहेत. मात्र मुख्य जलकुंभमध्ये पाणी जात नसल्याने समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.