सध्याच्या कोरोना विरुद्धच्या लढ्यात शहरातील व्हेगा हेल्मेट कंपनी आपल्या परीने भरीव सहाय्य करत आहे त्या अनुषंगाने गुरुवारी व्हेगा हेल्मेट कंपनीतर्फे पोलीस खात्याला 200 पोलीस हेल्मेट्स मोफत देण्यात आले.
कंपनीच्या कार्यालयांमध्ये गुरुवारी आयोजित कार्यक्रमात वेगाचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप चांडक यांनी पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्याकडे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बनविलेले 200 हेल्मेट सुपूर्द केले.
याप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, गुन्हा व रहदारी विभाग पोलीस आयुक्त यशोदा वंटगोडी, बेळगाव जिल्हा औद्योगिक केंद्राचे उपसंचालक दोड्ड बसवराज, बीडीएसएसआयचे अध्यक्ष रोहन जवळी, वेगा हेल्मेटचे संचालक गिरिधर चांडक, उत्तम चांडक, सुहास चांडक, कुणाल चांडक, पार्थ चांडक आणि वेदांत चांडक यांच्यासह चेंबर ऑफ कॉमर्सचे श्रीधर उप्पीन, सीआयआय चेअरमन जयंत हुंबरवाडी, उद्योजक सचिन सबनीस, धनेश मेत्रानी आणि मेत्रानी प्रकाश मुगळी आदी उपस्थित होते.
कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी व्हेगा हेल्मेट कंपनीने डॉक्टर, पोलिस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खास फेस शिल्ड, गॉगल्स, पीपीई सूट, पोलीस हेल्मेट व इंडस्ट्रियल हेल्मेटचे उत्पादन केले आहे यापैकी बहुतांश उत्पादनांचे संबंधितांना मोफत वितरण करण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 200 हेल्मेट्स मोफत दिल्याबद्दल पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी व्हेगा कंपनीचे आभार मानले आहेत.