रात्री जेवण करून फिरायला गेलेल्या तीन महिलांना भरधाव कारने चिरडल्याने दोघींचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री अकरा वाजता मुतगा येथे घडली आहे.भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा कार्यकर्ता युवराज जाधव हा आपल्या कारमधून जात असताना वाहनवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे.
भरधाव कार स्पीडब्रेकर वरून गेल्याने कार चालकाचे नियंत्रण सुटले.कार चालक देखील अपघातात जखमी झाला आहे.या प्रकरणी मारिहाळ पोलिसात युवराज जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.विवेक भाऊसाहेब पाटील यांनी याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली आहे.रस्त्याच्या कडेने जात असलेल्या तीन महिलांना चिरडल्यावर अपघातग्रस्त कार पुढे एका दुकानाला जावून धडकली.
सविता बाळकृष्ण पाटील(44) आणि विद्या भाऊसाहेब पाटील (47) अशी मृतांची नावे आहेत.शांता बाळकृष्ण चौगले (52) असे जखमी महिलेचे नाव आहे.या तिन्ही महिला एकमेकींच्या खास मैत्रिणी होत्या.सविता पाटील यांच्या पश्चात तीन मुली आणि एक मुलगा आहे.सविता यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
विद्या पाटील यांचे पती कोची येथे सेवा बजावत असून ते बेळगावला यायला निघाले असून ते आल्यावर विद्या यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.विद्या यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी आहेत.अपघातात मृत झालेल्या दोन महिलामुळे मुतगा गावावर शोककळा पसरली आहे.