बकरी चारण्यास गेलेल्या मेंढपाळ मामा,भाच्याचा शेडची भिंत पडून त्याखाली सापडून मृत्यु झाल्याची घटना कोंडसकोप येथील शेतवाडीत घडली आहे.मृत्युमुखी पडलेल्यांची नावे यल्लाप्पा सिद्धाप्पा सांबरेकर, परशराम गंगाप्पा शहापुरकर अशी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेजण कोंडसकोप परिसरात बकरी चारण्यास गेले होते.त्यावेळी पावसाला प्रारंभ झाला.पावसापासून बचाव करण्यासाठी म्हणून हे मामा,भाचे तेथे जवळच असलेल्या शेडमध्ये गेले.सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेडचे पत्रे उडून गेले.नंतर पावसापासून बचावासाठी ते शेडच्या कोपऱ्यात जावून थांबले.त्यावेळी मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली.
भिंत कोसळल्यावर या दोघांचा त्याखाली दबून मृत्यू झाला.ही घटना घडली त्यावेळी अन्य मेंढपाळ देखील बकरी चारण्यास त्या भागात आले होते.त्यांच्या बकर्याच्या कळपात यांची बकरी मिसळली पण हे दोघे कोठे दिसले नाहीत.त्यामुळे मेंढपाळानी पाहणी केली असता भिंत पडून मामा,भाचे मृत्युमुखी पडल्याचे समजले.या घटनेची हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.