बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या स्थिर असली तरी राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच असून दावणगिरी येथे एकाच दिवशी तब्बल 21 कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 642 इतकी वाढली आहे.
राज्य शासनाने सोमवारी जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार रविवार दि. 3 मे रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज सोमवार दि. 4 एप्रिल 2020 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 28 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये दावणगिरी येथील 21 रुग्णांचा समावेश आहे या 21 रुग्णांपैकी 12 पुरुष असून 9 महिला आहेत. दावणगिरी खेरीज राज्यातील मंड्या (2), हावेरी (1), विजयपुरा (1) व कलबुर्गी (2) या जिल्ह्यांमध्ये कोरणाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. हावेरी जिल्ह्यातील सावनूर येथे एक रुग्ण आढळून आला असून कलबुर्गी जिल्ह्यातील दोन रुग्णांमध्ये एक पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे. नव्याने आढळून आलेल्या 28 रुग्णांमुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 642 झाली आहे. यापैकी 26 जणांचा मृत्यू झाला असून 304 जणांना उपचाराअंती पूर्णपणे बरे झाल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, बेळगाव जिल्ह्याला शनिवारी सायंकाळपासून आज दुपारपर्यंत थोडा दिलासा मिळाला असून या कालावधीत एकाही नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली नसल्यामुळे बाधितांचा आकडा 73 वर कायम आहे. बेळगाव जिल्ह्याचा समावेश “ऑरेंज झोन”मध्ये झाल्यानंतर अजून तरी नव्या रुग्णाची नोंद न झाल्याने प्रशासनाने सध्या सुटकेचा निश्वास सोडला आहे.