बेळगाव शहरातील रानडे कॉलनी, हिंदवाडी येथे अनोख्या पध्दतीने वृक्षारोपण करण्यात आले. आयकर विभागातील निवृत्त कर्मचारी आणि जायंट्स मेनच्या माध्यमातून समाजसेवा करणारे दत्ता कंग्राळकर आणि कुटुंबियांनी आईचे रक्षा विसर्जन न करता त्या माध्यमातून आईची स्मृती जागृत ठेवण्यासाठी घरातील अंगणात वृक्षारोपण केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
मृत्यूनंतर आत्म्याला शांती मिळावी, या उद्देशाने विविध जुन्या रूढी, परंपरा आजही मानव जातीला अगदी घट्ट चिकटून बसल्या आहेत. मृतदेहाला भडाग्नी दिल्यानंतर उर्वरीत अस्थी आणि रक्षा विसर्जनासाठी परंपरेनुसार विविध तीर्थस्थळावर जाण्याची नातलगांची भावना आहे. पण याला अपवाद ठरले ते कंग्राळकर कुटुंबीय, त्यांनी जलप्रदुषणाची समस्या लक्षात घेऊन पारंपरिक प्रथेला फाटा देत आईच्या मृत्यूनंतर रक्षा विसर्जन न करता आपल्याच घरातील अंगणात याच राखेचा उपयोग करून वृक्षारोपण करीत आपल्या मायमाऊलीची आठवण कायम स्मरणात राहील हा उद्देश समाजासमोर ठेवून एक चांगल्या प्रकारचा आदर्श उभा केला आहे.
![Tree plantation](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/05/FB_IMG_1589118634816.jpg)
मुळात अजूनही अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर करण्यात येतो,पूर्वी व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावे एक झाड लावले जायचे कालांतराने झाड लावणे बंद झाले आणि त्याची जागा प्रातिनिधिक स्वरूपात फुलांच्या तयार झाडाने घेतली. अंत्यसंस्काराला हे तयार झाड आणले जाऊ लागले, पण शांताबाई कंग्राळकर यांच्या निधनानंतर केलेले वृक्षारोपण समाजाला परत एकदा या जुन्या परंपरेचा विचार करायला लावणारे ठरले आहे.