महाराष्ट्र आणि गोव्यातून बेकायदा बेळगावात प्रवेश केलेले तीन कोरोना संशयित बेळगाव बस स्थानकावर सापडले.बस स्थानकावर सेवा बजावणारे पोलीस हवालदार एस बी मडीवाळ यांच्या नजरेला हे तीन जण पडले.लगेच त्यांनी थांबवून त्यांची चौकशी केली असता ते गोवा आणि महाराष्ट्रातून आल्याचे समजले.
हवालदार एस बी मडीवाळ यांनी लगेच याची माहिती मार्केट पोलीस स्थानकाचे सीपीआय संगमेश शिवयोगी यांना दिली.ते लगेच बस स्थानकावर दाखल झाले आणि रुग्णवाहिका बोलवून त्यांनी त्या तिघांना क्वारंटाईन करण्यासाठी पाठवून दिले.
त्यापैकी एक जण विट्या हून आला होता आणि तो खानापूर तालुक्यात जाण्याच्या तयारीत होता.त्याला 103 ताप असल्याचे आढळून आले आहे.अन्य एक जण पुण्याहून आला होता तर एक गोव्याहून आला होता.हवालदारांच्या प्रसंगावधनाने हे तीन संशयित सापडले अन्यथा त्यांच्यामुळे अन्य लोकांना संसर्ग होण्याची शक्यता होती.
दरम्यान 31 मे पर्यंत महाराष्ट्रासह चार राज्यातून बेळगावात प्रवेश करणाऱ्यावर बंदी घातली आहे महाराष्ट्र मध्ये तर कोरोनाने कहर घातला आहे. कर्नाटकात तर महाराष्ट्र रिटर्न्स मुळे पोजिटीव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे.