गोकाक (जि. बेळगाव) येथील काॅरन्टाईन सेंटरमधून शनिवारी सायंकाळी पळून गेलेल्या एका महिलेला आज रविवारी पोलिसांनी बेल्लद बागेवाडी येथे ताब्यात घेतले. तसेच तिची व तिच्या नवऱ्याची पुन्हा काॅरन्टाईन सेंटरमध्ये रवानगी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून आलेल्या सदर महिलेला गोकाक येथील देवराज अर्स हॉस्टेलमधील काॅरन्टाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. काल शनिवारी तिचा नवरा तिची भेट घेण्यासाठी काॅरन्टाईन सेंटर बाहेर वाट पहात थांबला होता. बहुदा त्यानेच संबंधित महिलेला काॅरन्टाईन सेंटरमधून पळून जाण्यास प्रोत्साहित केल्याचा अंदाज आहे.
शनिवारी सायंकाळी काॅरन्टाईन सेंटरमधून पळालेली संबंधित महिला बेल्लद बागेवाडी येथे नवऱ्यासह लपून बसण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून त्या नवरा-बायको उभयतांना पुन्हा काॅरन्टाईन केंद्रात दाखल करण्यात आले आहे.