राज्यात गेल्या 24 तासात नव्याने तब्बल 54 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असल्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,146 इतकी वाढली आहे. तसेच उपचारांती पूर्णपणे बरे झालेल्या एकूण 497 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कर्नाटक राज्य शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या रविवार 17 मे रोजीच्या दुपारच्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यात नव्याने 54 कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 1146 झाली असून यापैकी 37 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 611 ॲक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत एकूण 497 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नव्याने आढळून आलेल्या 54 कोरोना बाधितांपैकी सर्वाधिक बाधित मंड्या जिल्ह्यातील आहेत. मंड्या जिल्ह्यामध्ये 22 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून त्याखालोखाल कलबुर्गी जिल्ह्यात 10 रुग्ण आढळले आहेत.
त्याचप्रमाणे हासन जिल्ह्यात 5 रुग्ण, धारवाड जिल्ह्यात 4, यादगीर व कोलार येथे प्रत्येकी 3, मंगळुरू व शिमोगा जिल्ह्यात प्रत्येकी 2 आणि उडपी, विजयपुरा व कोलार जिल्ह्यात प्रत्येकी 1 कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. यामध्ये 35 पुरुष आणि 19 महिलांचा समावेश आहे.