परराज्यातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या भागात होऊ नये यासाठी सध्या कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शासनाचा हा निर्णय स्तुत्य असला तरी स्थानिक नागरिक, शेतकरी आणि कामगार वर्गाला मात्र सध्या मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेंव्हा बेळगाव आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने याकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांना दिलासा देण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेळगाव आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने चंदगड आणि बेळगावला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यावर बाची आणि शिनोळी येथे चेक पोस्ट उभारले आहेत. याठिकाणी आंतरराज्य वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. उभय प्रशासनाचा हा निर्णय स्तुत्य आहे. मात्र सध्या लॉक डाऊनचा नियम शिथील करण्यात आला आहे. दैनंदिन व्यवहारांसह महानगरपालिका नगरपालिकांचे कार्यक्षेत्र वगळता अन्य ठिकाणी उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार शिनोळी येथील बहुतांश उद्योग धंदे सुरू झाले आहेत. ही वस्तुस्थिती असताना देखील बेळगाव शिनोळी मार्ग चक्क मातीचा ढिगारा टाकून बंद करण्यात आल्यामुळे तीव्र नाराजी केली जात आहे.
तथापि केंद्र शासनाकडून आदेश आलेला असतानादेखील अद्यापही शिनोळी ( ता. चंदगड, जि. कोल्हापूर) आणि बाची (ता. जि. बेळगाव) ठिकाणच्या चेक पोस्टवर कामगार आणि विशेष करून शेतकऱ्यांची अडवणूक करून मुस्कटदाबी केली जात आहे. यासाठी या ठिकाणी चक्क प्रमुख मार्ग मातीचा ढिगारा टाकून बंद करण्यात आला आहे. महाराष्ट्र सीमेलगतच्या कर्नाटकातील बऱ्याच गावांमधील तसेच खुद्द बेळगावातील बरेचसे कामगार शिनोळी औद्योगिक वसाहतीत कामाला जातात. या कामावर संबंधित कामगारांचा उदरनिर्वाह चालतो.
औद्योगिक क्षेत्रातील कामगारांप्रमाणेच कर्नाटक हद्दीतील बऱ्याच शेतकऱ्यांची शेतजमीन महाराष्ट्र हद्दीत आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनी लगतच्या कर्नाटक हद्दीत आहेत. मात्र सध्याच्या लॉक डाऊनच्या आदेशामुळे यापैकी कोणालाही हद्द ओलांडण्यास परवानगी दिली जात नसल्यामुळे त्यांच्यावर बिकट परिस्थिती ओढवली आहे. परिणामी लॉक डाऊनचे कारण पुढे करून आपल्याला विनाकारण त्रास दिला जात असल्याचा आरोप कामगारवर्गासह शेतकऱ्यांकडून केला जात आहे. तरी बेळगाव आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन शेतकरी व कामगार वर्गाला दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी केली जात आहे.
यापूर्वी कोरोना प्रादुर्भावाचा भीतीने बेळगाव व चंदगड तालुक्याला जोडणाऱ्या कांही रस्त्यांवर चरी खोदून वाहतूक बंद करण्यात आली होती. यासंदर्भात कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर त्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार कार्यवाही होऊन रस्त्यावरील चरी बुजविण्यात आल्या. मात्र आता बेळगाव – शिनोळी मार्गावर भर रस्त्यावर मातीचा ढिगारा टाकण्याचा हा प्रकार घडल्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.