दोन महिन्यांपासून एपीएमसी येथील भाजी मार्केट लॉक डाऊन काळात बंद करण्यात आले होते. मात्र आता सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल दोन महिन्यानंतर एपीएमसी येथील भाजी मार्केट गजबजणार असल्याचे दिसून येणार आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे अनेक उद्योगधंद्यावर टाच आली होती. मात्र लॉक डाऊन शिथिल करण्यात आल्याने अनेक कारखाने तसेच इतर व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत भाजीमार्केट ही बंद करण्यात आले होते. नागरीकांची गैरसोय नको म्हणून एपीएमसी प्रशासनाने शहरातील तीन ठिकाणी भाजी मार्केट सुरू केले होते.
काही ठिकाणी नागरिकांची पुन्हा गर्दी दिसून आली. आता पाचव्या टप्प्यातील लॉक डाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने प्रशासनाने पुन्हा भाजी मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान एपीएमसी आवारात भाजी मार्केट असलेल्या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रत्येक दुकानासमोर मार्ग सूची तयार करून त्याठिकाणी भाजी खरेदी विक्री करण्यात येणार आहे. दोन महिन्यानंतर या ठिकाणी भाजी खरेदी विक्री होत असल्याने समाधान व्यक्त होत असतानाच येथे प्रशासनाच्या आर्थिक उलाढालीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या कांदा मार्केट बटाटा मार्केट आणि रताळी मार्केट काही प्रमाणात येथील आवक कमी होत आहे. त्यामुळे गर्दी कमी होऊ लागली आहे. आता पुन्हा भाजी मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाने सुरक्षित ठेवण्याच्या पर्याय दुकान दाराला दिला आहे. त्यामुळे सोमवारपासून या ठिकाणी भाजी खरेदी विक्री होण्यात सुरुवात होणार आहे.
जिल्हा अधिकाऱ्यांनी यासाठी हिरवा कंदील दाखवला असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत एपीएमसीचे अध्यक्ष आनंद पाटील यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सोमवार दिनांक 1 जून पासून एपीएमसीतील भाजी मार्केट सुरू होणार असल्याचे सांगितले आहे.