रेल्वे स्थानक आवारातील रेल्वे खात्याच्या इमारतीतील रेकॉर्ड रूमला (एमओसी) मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून घडलेल्या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भल्या सकाळची वेळ असल्यामुळे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बेळगाव रेल्वे स्थानक आवारातील एका इमारतीमध्ये रेल्वे खात्याचे रेकॉर्ड रूम अर्थात एमओसी आहे. सदर रेकॉर्ड रूमला आज मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सकाळची वेळ आणि वर्दळ कमी असल्याने प्रारंभी ही बाब लवकर कोणाच्या लक्षात आली नाही. प्रारंभी रेकॉर्ड रूममधून धूर येऊ लागला आणि मग बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले.
आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट जेंव्हा इमारतीतून बाहेर पडू लागले, तेंव्हा रेल्वे अधिकारी आणि नागरिकांना आगीचा प्रकार लक्षात आला. इमारतीत मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे लक्षात येताच सर्वांची एकच धावपळ उडाली. तेंव्हा कांहीनी अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली.
सदर माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाण्याच्याबंबासह घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यानंतर पाण्याचा फवारा मारून महत्प्रयासाने आग आटोक्यात आणली. तथापि तोपर्यंत रेकॉर्ड रूममधील रेल्वे खात्याची सर्व कागदपत्रे आणि आणि इतर साहित्य जळून भस्मसात झाले होते. सकाळची सहाची वेळ असल्याने रेकॉर्ड रूम बंद होते. त्यामुळे सदर दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.