कोरोना आणि लॉक डाऊनमुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या व्यापारी आणि दुकानदारांकडून “पोलीस डे” साठी पैसे वसूल केले जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच हा प्रकार त्वरित थांबवावा अशी मागणी केली जात आहे.
कोरोनाचे संकट आणि लॉक डाऊनमुळे शहरातील व्यापारी आणि दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अलीकडेच सर्व व्यापारी व दुकानदारांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. उपनगरातील बाजारात पूर्वीप्रमाणे अद्याप ग्राहकांची गर्दी होताना दिसत नाही आहे. परिणामी दुकानदार व व्यापाऱी सध्या तोट्यामध्ये आपला व्यवसाय करत आहेत.
ही वस्तुस्थिती असताना शहापूर व खासबाग भागामध्ये पोलिसांकडून “पोलीस डे” साठी पैसे गोळा केले जात आहेत. पोलीस आपल्या दुचाकी वाहनांवरून गल्लोगल्ली फिरून दुकानदार व व्यापाऱ्यांना “पोलीस डे” चे तिकीट देऊन 500 ते 2000 रुपयापर्यंत देणगी स्वरूपात पैशाची मागणी करत आहेत.
यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या व्यापारी व दुकानदारांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त होत आहे. तथापि पोलिसांना नाही म्हणता येत नसल्यामुळे अनेकांना मनाविरुद्ध पैसे द्यावे लागत आहेत. तेंव्हा आधीच आर्थिक तंगी सोसणाऱ्या दुकानदारांची पोलिसांनी आणखी आर्थिक पिळवणूक करू नये. त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन “पोलीस डे” च्या नांवावर जबरदस्तीने पैसे वसूल करण्याचा प्रकार थांबवावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.