बेळगाव शहरासह जिल्ह्यातील बऱ्याच प्रतिष्ठित नागरिकांनी साप्ताहिक सुट्टी घालविण्यासाठी शहरासह गावाबाहेर आपल्या मालकीच्या शेतात जी घरे (फार्महाऊस) अथवा ज्यादाची घरे बांधली आहेत, सध्याच्या कोरोना प्रादुर्भावापासून सुरक्षित राहण्यासाठी आता तीच घरे संबंधित नागरिकांसाठी सुरक्षित आसरा देणारी कायमस्वरूपी घरे बनली असल्याचे पहावयास मिळत आहे.
सध्या कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी बहुतांश नागरिक सर्वोत्तम खबरदारीचा पर्याय म्हणून स्वतःला गर्दी आणि अपरिचित व्यक्तीपासून दूर ठेवत आहेत. त्याच अनुषंगाने शेतकरी उद्योजक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आधी ज्या लोकांचे गर्दीपासून दूर फार्महाऊस अथवा जादाची घरी आहेत त्यांनी आपल्या कुटुंबासह त्या ठिकाणी स्थलांतर केले आहे माजी नगरसेवक लतीफखान पठाण हे अशाच लोकांपैकी एक आहेत, जे आपल्या संपूर्ण कुटुंबासह बेळगाव तालुक्यातील देसुरनजीकच्या काटगाळी येथील आपल्या फार्महाऊसवर राहण्यास गेले आहेत. माझ्या कुटुंबासमवेत मी जेंव्हा फार्म हाऊसमध्ये राहायला आलो त्यावेळी शहरात आपण कशाप्रकारे आरोग्यपूर्ण वातावरण आणि निसर्गसौंदर्याला मुकत होतो याची मला जाणीव झाली, असे लतीफखान पठाण यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शेतातील घरात राहण्यास आल्यानंतर शेतीकडे लक्ष द्यायला लागल्या पासून आपल्याला शेतकऱ्यांचे कष्ट त्यांच्या समस्या आणि यातना लक्षात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पठाण यांच्याप्रमाणेच काटगाळी परिसरातच स्वतःचे फार्महाउस असलेली उद्योजक जयदीप सिद्दणावर म्हणाले की, या ठिकाणी राहून शहरातील व्यवसाय हाताळणे जरा कठीण असले तरी येथे शहरापेक्षा अधिक हवेशीर आणि आरामदायक वाटते. माझ्या फार्म हाऊसमधून मला आणि माझ्या कुटुंबीयांना विविध जातीचे पक्षी, हंबरणारी हरणे, गवे रेडे, साप आदी वन्यजीव न्याहाळायला मिळतात. या ठिकाणी खरोखर स्वर्ग आहे, असेही सिद्दणावर म्हणतात.
मालवाहतूक दार आणि शेतकरी असणारे अनिल हंबळ्ळी यांचे खानापूर तालुक्यातील रामपूर वाडी येथे फार्म हाऊस आहे शेतात काम करणे निसर्गाच्या सान्निध्यात राहणे यासारखा दुसरा आनंद नाही असे हंबळ्ळी म्हणतात खानापूर गावात स्वतःचे घर असणारे अनिल हंबळ्ळी सध्या खानापूर पासून 2 किलोमीटर अंतरावर गावाबाहेर असणाऱ्या आपल्या फार्म हाऊसमध्ये वास्तव्यास आहेत. या ठिकाणी राहण्यास आल्यामुळे इतरांप्रमाणे लॉक डाऊनच्या काळात मला बंदीस्त असल्यासारखे कधीच वाटले नाही. फार्म हाऊसमध्ये असल्यामुळे मी या ना त्या कामात नेहमी व्यस्त असतो. त्यामुळे वेळ कसा निघून जातो हे कळत नाही असेही अनिल हंबळ्ळी यांनी सांगितले. या मंडळींप्रमाणे बेळगावातील ज्यांची शहराबाहेर अथवा गावाबाहेर अतिरिक्त घरे अथवा फार्म हाऊस आहेत. तेदेखील सध्या हाच अनुभव घेत आहेत.