केंद्र शासनाच्या आदेशानुसार बेळगाव जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आला असून त्या संदर्भातील मार्गदर्शक सुची जाहीर करण्यात आली आहेत. तथापि बेळगाव शहरात नेमके काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी पार पडलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.
देशातील दुसऱ्या टप्प्यातील लाॅक डाऊन आज रविवारी समाप्त झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने उद्या सोमवार दि. 4 एप्रिल 2020 पासून राज्यातील रेडझोन जिल्हे आणि कंटेनमेंट झोन वगळता अन्य ठिकाणचे व्यवहार पूर्ववत सशर्त सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार ऑरेंज झोनमध्ये असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील बहुतांश दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू होणार आहेत. तथापी बेळगाव शहरात संगमेश्वरनगर, अझमनगर, आझाद गल्ली, अमननगर व कॅम्प हे भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. थोडक्यात बेळगाव शहर चारीही बाजूने कंटेनमेंट झोनने व्यापले गेले असल्यामुळे याठिकाणी नेमके कोणते व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली जावी यासंदर्भात रविवारी सायंकाळी शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मार्केट विभागाचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या कार्यालयाच्या आवारात सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत सखोल चर्चेअंती उद्यापासून शहरातील किराणा मालाची दुकाने, बेकरी, स्वीट मार्ट, दुध डेअरी, औषधाची दुकाने आदी जीवनावश्यक गरजेच्या वस्तूंची दुकाने सुरू राहतील. तथापि याठिकाणी सोशल डिस्टन्ससिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक असेल. याबाबतीत हलगर्जीपणा आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ऑटोरिक्षामध्ये चालक आणि एका प्रवाशाला परवानगी असणार आहे. दुचाकीवरून फक्त एकच व्यक्ती प्रवास करू शकते. दोघेजण फिरताना आढळल्यास दंडात्मक कारवाई बरोबरच पोलिसांच्या लाठीचा प्रसादही दिला जाईल. चारचाकी वाहनांमध्ये चालकाव्यतिरिक्त दोघा जणांना प्रवास करण्यास अनुमती असेल. याचे उल्लंघन करणारे दंडास पात्र ठरतील. थोडक्यात कार, ऑटोरिक्षा, मोटरसायकल आदींना शहरातील संचारास सशर्त परवानगी असेल.
अत्यंत महत्त्वाचे म्हणजे शहरातील कपड्याची दुकाने, कोल्ड्रिंक हाऊस, हॉटेल – रेस्टॉरंटस् आणि गल्लीत भरणारे बाजार हे बंद ठेवण्याचा निर्णय पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती आहे.
त्याचप्रमाणे सोमवार 4 मे पासून सायंकाळी सात वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. या कालावधीत 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेश तर जारी राहणारच असून शहर निर्मनुष्य संचारबंदी सदृश्य राहील याची खबरदारी घेण्यात येणार आहे. दरम्यान रविवारी सायंकाळी झालेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीतील निर्णयाबाबत शहरातील सर्व पोलीस स्थानकांना कळविण्यात आले असून या निर्णयांची सोमवारपासून काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगावात सोमवारी वरील दुकाने सुरू करून पोलीस सोशल डिस्टन्सच पालन योग्य रित्या होते की नाही लोकं किती गर्दी करतात याकडे ट्रायल म्हणून बघणार आहेत. जर का योग्य रित्या काटेकोरपणे अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा लॉक डाऊन काटेकोरपणे करणार आहेत.या काळात गर्दी करून नियम मोडणाऱ्यांना लाठीचा प्रसाद नक्की मिळणार हे देखील नक्की आहे त्यामुळे बेळगावातील लोकांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून घरा बाहेर पडणे गरजेचे आहे.