सदाशिनगर येथील एका भाजी विक्री त्याची ऑनलाईन फसवणूक करून त्याच्या बँक खात्यातील 8,750 रु. अज्ञातांनी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार आज सोमवारी सकाळी उघडकीस आला.
फसवणूक झालेल्या भाजीविक्रेत्यांचे नांव दीपक लांडे असे आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सदाशिवनगर येथील दीपक लांडे या युवकाला काल रात्री कविता पटेल नामक एका महिलेचा फोन आला तिने आपण आर्मीत असल्याची बतावणी करून भाजीची ऑर्डर दिली आणि भाजी घेऊन जाण्यासाठी सकाळी आर्मीची गाडी येईल असे दीपकला सांगितले. रोजचा व्यवसाय असल्याने आणि आता लाॅक डाऊनमध्ये अनेक जण फोनवर ऑर्डर देत असल्यामुळे दिपकला ते खरे वाटले.
त्या महिलेच्या मागणीनुसार दिपकने 3,750 रुपयांची भाजी बांधून तयार ठेवली. त्यानंतर आज सकाळी त्या महिलेचा पुन्हा फोन आला आणि तिने भाजी घेण्यास गाडी पाठवली असल्याचे सांगून पैसे देण्यासाठी अकाउंट नंबर मागितला. त्यानुसार दीपकने त्या महिलेला आपल्या बँक खात्याचा तपशील आणि कार्ड नंबर दिला.
लागलीच त्या महिलेने कार्ड प्रोसेस करत गडबडीत दीपककडून ओटीपी नंबर काढून घेतला. दुकानात इतर ग्राहक असल्यामुळे दिपकने आर्मीच्या लोकांची विश्वासाहर्ता गृहीत धरून त्यांना बँक खात्याची माहिती दिली होती. तथापि त्यानंतर आपल्या खात्यावर भाजीचे पैसे जमा होण्याची 3,750 रुपये खात्यातून वजा झाल्याचे आणि आणखी थोड्या वेळाने पुन्हा 5,000 रुपये वजा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे दीपक लांडे याच्या लक्षात आले.