कोरोना विरुद्धच्या लढ्यात पौरकार्मिक देखील आघाडीवर असून त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार ॲड अनिल बेनके यांनी मंगळवारी आपल्या मतदार संघाच्या एक्सटेंशन एरियातील सुमारे 60 कामगारांना जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वाटप केले.
बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आपल्या “कोव्हिड -19 सेवा अभियाना” अंतर्गत मंगळवारी आपल्या मतदारसंघाचा एक्स्टेंशन एरिया अर्थात विस्तारित प्रदेश स्वच्छ ठेवण्यासाठी राबणाऱ्या सुमारे 60 स्त्री-पुरुष पौरकार्मिकांना जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वाटप केले.
आपल्या या उपक्रमासंदर्भात “बेळगाव लाईव्ह”शी बोलताना आमदार ॲड अनिल बेनके यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, बेळगावातील कोरोना विरुद्धच्या फ्रंट लाईन फायटर्समध्ये डॉक्टर आणि नर्स यांच्याबरोबरच पौरकार्मिकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. यासाठी “कोव्हिड – 19 सेवा अभियान” अंतर्गत बेळगाव उत्तर मतदारसंघातील पौरकार्मिकांना आम्ही गृहोपयोगी जीवनावश्यक साहित्याचे वाटप करत आहोत कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वाधिक जोखीम घेऊन कोणी काम केले असेल तर ते पौरकार्मिक होत. यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांना गृहपयोगी जीवनावश्यक साहित्य देऊन त्यांच्या कार्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत आहोत. त्याचप्रमाणे येत्या काळात शहरात कोणीही भुकेला राहू नये यासाठी आमचा प्रयत्न असणार असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी स्पष्ट केले.
बेळगाव उत्तर मतदार संघातील सार्वजनिक साफसफाई करणाऱ्या पौरकार्मिकांपैकी 90 टक्के पौरकार्मिक माळ मारुती एक्सटेंशन एरियातील आहेत. यासाठी आज मंगळवारी सर्वप्रथम मारुती एक्सटेंशन एरियातील 60 पौरकार्मिकांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण करून धन्यवाद देण्यात आले आहेत. आता येत्या दोन दिवसात शहरातील उर्वरित पौरकार्मिकांना सरदार्स हायस्कूल मैदानावर बोलावून जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप केले जाईल, असेही आमदार बेनके यांनी स्पष्ट केले. दरम्यान आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या या उपक्रमाबद्दल पौरकार्मिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.