कर्नाटक सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 18 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 99 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये बेळगाव येथील दोन रुग्णांचा समावेश असून यामुळे राज्यातील कोरोना बाधीतांची एकूण संख्या 1,246 झाली आहे.
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार रविवार दि. 17 मे सायंकाळी 5 वाजल्यापासून सोमवार दि. 18 मे 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 99 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 63 पुरुषांचा आणि 36 महिलांचा समावेश आहे. यापैकी दोन रुग्ण बेळगाव जिल्ह्यातील आहेत. यापैकी पी-1226 क्रमांकाचा 23 वर्षीय पुरुष रुग्ण पी-575 क्रमांकाच्या सेकंडरी कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे कोरोनाग्रस्त बनला आहे, तर पी-1227 क्रमांकाची 23 वर्षीय महिला ही आंतरराज्य रुग्ण असून ती मुंबईहून बेळगावला आली आहे.
नव्याने 99 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1,246 इतकी वाढली आहे. यापैकी 530 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून 37 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच प्रमाणे ॲक्टिव्ह केसेस 678 असून यापैकी 12 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
वीरा 24 तासात राज्यात आढळून आलेल्या 99 रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण बेंगलोर शहरातील (24) आहेत. त्याचप्रमाणे मंड्या जिल्ह्यात 17, कलबुर्गी जिल्ह्यात 10, कारवार जिल्ह्यात 9 आणि यादगिर जिल्ह्यात 6 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. याव्यतिरिक्त कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेल्या जिल्ह्यांमध्ये हासन, रायचूर, कोप्पळ, विजयपुरा, गदग, बेळ्ळारी, दावणगिरी, बिदर, म्हैसूर, कोडगु, बेळगाव, उडपी व मंगळूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.