आमच्याकडून घेतलेले प्रवास खर्चाचे पैसे हवे तर परत देऊ नका, कांहीही करा परंतु आम्हाला आमच्या मूळ गावी पाठविण्याची तात्काळ व्यवस्था करा, अशी जोरदार मागणी बेळगावात अडकून पडलेल्या उत्तर भारतीय स्थलांतरित कामगारांनी
आज गुरुवारी जिल्हाधिकार्यांकडे केली.
लॉक डाऊनमुळे गेल्या दोन महिन्यापासून बेळगावात अडकून पडलेल्या उत्तर भारतातील स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याची व्यवस्था प्रशासनाकडून अद्यापही करण्यात आलेले नाही. यामुळे संत्रस्त झालेल्या 100 हून अधिक उत्तर भारतीय स्थलांतरित कामगारांनी आज गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन लवकरात लवकर आपल्याला परत आपल्या मूळगावी पाठवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली. आम्हाला लवकरात लवकर आमच्या मूळगावी जावयाचे आहे. त्यासाठी प्रशासनाने आमच्या प्रवासाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिली आहे. त्याचप्रमाणे आमच्याकडून प्रवास खर्चाचे प्रत्येकी 1,100 रुपये जमा करून घेतले आहेत. मात्र गेल्या दोन दिवसापासून आम्हाला एकदा सीपीएड मैदानावर जा, एकदा जिल्हाधिकार्यालय कडे जा असे सांगून सारखी पळवापळवी केली जात आहे. प्रत्यक्षात आम्हाला आमच्या मूळ गावी पाठविण्यासाठी प्रवासाची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने कोणतीच हालचाल सुरू असल्याचे दिसून येत नाही आहे, असे या कामगारांनी सांगितले.
आता विचारणा केली असता 3 – 4 दिवसात तुम्हाला तुमच्या गावी पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. प्रवास खर्चासाठी म्हणून घेतलेले प्रत्येकी 1,100 रुपये देखील तुम्हाला परत केले जातील. तुमची आम्ही मोफत तुमच्या गावी पाठवण्याची व्यवस्था करू, असे सांगितले जात आहे. आम्ही आतापर्यंत बरीच वाट पाहिली आहे.. यापुढे आम्ही आणखी वाट पाहू शकत नाही. वाटल्यास आमच्याकडून जमा करून घेतलेले 1,100 रुपये आम्हाला परत देऊ नका. परंतु आम्हाला आमच्या गावी पाठविण्याची तात्काळ व्यवस्था केली जावी, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जमलेल्या स्थलांतरित कामगारांनी केली आहे.
तातडीच्या कामानिमित्त कार्यालयाबाहेर निघालेल्या जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी जाता जाता आपल्या गाडीतूनच जमलेल्या स्थलांतरित कामगारांची समस्या जाणून घेतली. तसेच त्यांना त्यांच्या मूळ गावी परत पाठवण्याची व्यवस्था लवकरात लवकर केली जाईल असे आश्वासनही दिले.