कोरोनाचे संकट असतानाच मजगाववासीयांना आता आणखी एका संकटाशी सामना करण्याची वेळ आली आहे.कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देश लढत असताना मजगावच्या जनतेला मात्र एकाचवेळी कोरोना आणि डेंग्यूशी सामना करावा लागत आहे.
मजगावमधील फक्त लक्ष्मी गल्लीत आजवर डेंग्यूचे तीस रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे लोकात भीती निर्माण झाली असून डेंग्यू रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्यात आलेले आहे.
मजगाव गावातील जनतेची गावात ड्रेनेज सिस्टीम घालण्याची मागणी आहे.सध्या गावातील गटारी तुंबून डेंग्यू झपाट्याने पसरत आहे.तीन महिन्यातून एकदा मनपा कर्मचारी गटार साफ करायला येतात.गटार साफ केल्यावर गटारीतील कचरा गटाराच्या कडेला टाकून निघून जातात.आठ दिवसांनी त्या कचऱ्याची उचल केली जाते.सध्या गावातील रस्त्याचे टेंडर मंजूर झाले आहे.पण रस्ता करण्यापूर्वी ड्रेनेज लाईन गावात घालावी अशी जनतेची मागणी आहे.
डासांना प्रतिबंध करण्यासाठी केली जाणारी औषध फवारणी म्हणजे निव्वळ डोळ्यात धूळफेक केली जाते.गावात स्वच्छता राखली तर डासांची वाढ कमी होऊन डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी होईल असे जनतेला वाटते.गावातील रस्तेही स्वच्छ केले जात नाहीत अशी जनतेची तक्रार आहे.डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपाने त्वरित उपयाययोजना करावी अशी मागणी मजगाव येथील जनता करत आहे.
बेळगाव मनपा आरोग्य खात्याने केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी निर्जंतुक फवारणी केली आहे याचा कोणताही उपयोग झाला असून गटारी खुल्या आहेत तिथं डास एकत्रित होत आहेत अश्या वेळी आरोग्य खात्याने या गावात पहाणी करावी अशी मागणी वाढत आहेत. अनेक जण खाजगी इस्पितळात भर्ती असून डेंग्यूवर उपचार घेत आहेत मनपा आरोग्य खात्याला जाग येईल का? प्रश्न महत्वाचा आहे.