केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमधील अत्याधुनिक रिव्हर्स ट्रांस्क्रीप्शन पोलिमरेझ चेन रिॲक्शन अर्थात आरटी-पीसीआर प्रयोग शाळेचा (मॉलिक्युलर लॅब) उद्घाटन समारंभ बुधवारी उत्साहात पार पडला.
केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांच्या हस्ते हे नव्याने उभारण्यात आलेल्या या आरटी-पीसीआर प्रयोग शाळेचे उद्घाटन झाले आपल्या उद्घाटनपर भाषणात मंत्री सुरेश अंगडी यांनी ही प्रयोगशाळा म्हणजे कोरोना विषाणूचे अचूक निदान करणारी तसेच या विषाणूचा अभ्यास करता येणारी सर्वोत्तम प्रयोगशाळा असल्याचे सांगितले. ही प्रयोगशाळा उत्तर कर्नाटकातील गरजू नागरिकांसाठी एक प्रकारचे वरदान असल्याचे सांगून कोरोनाला रोखण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी, नर्स, आरोग्य कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीत लढा देत आहेत. तेंव्हा या कोरोना वॉरियर्सना जनतेने संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री सुरेश अंगडी यांनी केले.
केएलई सोसायटीचे चेअरमन खासदार प्रभाकर कोरे यांनी यावेळी बोलताना कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी आपली संस्था व हॉस्पिटल जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगितले सोसायटी निरोगी सुदृढ समाज निर्मितीसाठी नेहमीच प्रयत्नशील असते असे सांगून सद्यपरिस्थितीत लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्क वापरावेत हेच उपाय कोरोना विषाणूला रोखू शकतात, असेही खासदार कोरे यांनी स्पष्ट केले. उद्घाटन समारंभानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी प्रयोग शाळेची पाहणी करून तेथील कार्यप्रणालीची माहिती घेतली.
केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमधील अत्याधुनिक रिव्हर्स ट्रांस्क्रीप्शन पोलिमरेझ चेन रिॲक्शन अर्थात आरटी-पीसीआर प्रयोग शाळेला जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ), इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि युनायटेड स्टेट फुड अॅन्ड ड्रग ऍडमिनिस्ट्रेटर (युएस एफडीए) यांची मान्यता मिळालेली आहे. या प्रयोगशाळेमध्ये कोरोना बरोबरच एच-1एन-1, क्षयरोग, कावीळ आदी रोगांचे निदान करण्याची आधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत.