कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे ॲक्टिव्ह कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेल्या कुडची शहरात गेल्या 28 दिवसात नव्याने एकही बाधित रुग्ण आढळून आला नसल्यामुळे येथील “कंटेनमेंट झोन” शून्य तासापासून हटविण्यात आला आहे.
कुडची (जि. बेळगाव) शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे गेल्या दि. 24 एप्रिल 2020 रोजी मध्यरात्रीपासून कुडची शहर ऍक्टिव्ह कंटेनमेंट झोन (निर्बंधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले होते. पूर्वेकडे आंबेडकर रोड डायमंड कोल्ड्रिंग शॉप, पश्चिमेकडे मकानदार हाऊस रोड, उत्तरेकडे आमीर मस्जिद आणि दक्षिणेकडे एपीएमसी ऑफिस परिसर या व्याप्तीमध्ये लागू करण्यात आलेल्या या कंटेनमेंट झोनमध्ये 752 घरे असून 37 दुकाने आणि 12 कार्यालयं आहेत. येथील लोकसंख्या 4,376 इतकी आहे.
कुडची शहरात पी – 147, 148, 149, 150, 223, 226, 243, 244, 245, 294, 296, 297, 298, 299, 300, 301, 448, व पी-463 या क्रमांकाचे एकूण 18 जण कोरोनाग्रस्त आढळून आले होते. परिणामी गेल्या 24 एप्रिल मध्यरात्रीपासून कुडची शहर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर आजतागायत गेल्या 28 दिवसात याठिकाणी नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे नियमानुसार कुडची शहरातील कंटेनमेंट झोन शून्य तासापासून रद्द करण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.