कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते बेंगलोर यांच्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 15 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 69 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 1056 इतकी झाली आहे. थोडक्यात गेल्या 24 तासात राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येने 1 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.
राज्यात गुरुवार दि. 14 मे रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज शुक्रवार दि. 15 मे 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत नव्याने 69 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. बेळगाव जिल्ह्यात मात्र गेल्या 24 तासात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. राज्यात नव्याने आढळून आलेल्या कोरोना बाधित यांपैकी सर्वाधिक रुग्ण मंगळूर जिल्ह्यातील आहेत. मंगळूर जिल्ह्यात 15 कोरोनाग्रस्त आढळून आले असून त्याखालोखाल बेंगलोर शहर आणि मंड्या येथे प्रत्येकी 13 रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे बिदर व हासन जिल्ह्यात प्रत्येकी 7, कलबुर्गी येथे 3, चित्रदुर्ग येथे 2 आणि कोलार, शिमोगा, बागलकोट व कारवार या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे.
राज्यात आत्तापर्यंत 1 लाख 33 हजार 724 स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून यापैकी 1 लाख 32 हजार 74 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. राज्यात आतापर्यंत बेंगलोर शहरांमध्ये सर्वाधिक 202 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून यापैकी 101 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बेंगलोर खरोखर बेळगाव (108), दावणगिरी (88) व म्हैसूर (88) हे जिल्हे अनुक्रमे दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. राज्यात आतापर्यंत 480 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून अॅक्टिव्ह केसीस एकूण 539 इतक्या आहेत. यापैकी 11 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत एकूण 36 जणांचा मृत्यू झाला आहे.