राज्यात एकाच दिवशी तब्बल 45 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 750 इतकी वाढली आहे. यापैकी 30 जणांचा मृत्यू झाला असून 371 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील 11 जणांचा समावेश आहे.
राज्य शासनाने शुक्रवारी दुपारी जाहीर केलेल्या आपल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धीपत्रकात नुसार काल गुरुवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज शुक्रवार दि. 8 मे 2020 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 45 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण दावणगिरी, हिरेबागेवाडी, कुडची (बेळगाव जिल्हा) आणि भटकळ – कारवार या ठिकाणी आढळून आले आहेत. नव्याने आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये दावणगिरी येथील 14, हिरेबागेवाडी येथील 11 आणि भटकळ येथील 12 रुग्णांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त राज्यात बेंगलोर शहरांमध्ये 7 आणि बेळ्ळारी येथे 1 कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे.
बेळगाव जिल्ह्यात आढळून आलेल्या 11 रुग्णांपैकी 6 पुरुष आणि 5 महिला आहेत. यापैकी कुडची येथील पी – 723 क्रमांकाचा 20 वर्षीय पुरुष रुग्ण पी – 775 क्रमांकाच्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोना बाधित झाला आहे. त्याचप्रमाणे हिरेबागेवाडी येथील पी – 547 या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे दोन पुरुष आणि दोन महिला कोरोना बाधित झाले आहेत. याव्यतिरिक्त एक पुरुष व दोन महिला पी – 552 क्रमांकाच्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने संसर्गजन्य बनल्या आहेत. याखेरीज हिरेबागेवाडीतील एक 20 वर्षीय युवक पी – 496 क्रमांकाच्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने आणि एका 38 वर्षीय महिला पी – 548 क्रमांकाच्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोना बाधित झाली आहे.
एकंदर बेळगाव जिल्ह्यात तिसऱ्यांदा कोरोना रुग्णांचा स्फोट झाला आहे. तथापि पुन्हा मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने दक्ष झालेल्या जिल्हा प्रशासनासह आरोग्य खात्याने योग्य ती पावले उचलण्यास सुरुवात केली असून सध्या जिल्ह्यातील हॉटस्पॉट असलेल्या हिरेबागेवाडी, रायबाग व कुडची या गावांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी या ठिकाणचे सर्व निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत.