कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व कुटुंब कल्याण सेवा आयुक्तांनी जाहीर केलेल्या शुद्धीपत्रकानुसार दुसऱ्या श्रेणीतील (रोगविरोधक) सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार असले तरी आता त्यामध्ये कांही सूट देण्यात आली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी यापुढे सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टिट्यून्शल काॅरन्टाईन) करण्यात येणार असले तरी आता त्यामध्ये काही सूट देण्यात आली आहे. आता आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे आगमन होताच लवकरात लवकर त्यांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल. या चाचणीमध्ये निगेटिव्ह आढळल्यास ठराविक प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणामधून वगळण्यात येईल. गर्भवती महिला, दहा वर्षे व त्याखालील वयोगटातील मुले, 80 वर्षे व त्यावरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार ग्रस्त रुग्ण (कॅन्सर, किडनी विकार, हृदय विकार आदी विकारग्रस्त) यांनाच ही सूट दिली जाणार आहे.
या सर्वांची खास वैद्यकीय पथकाकडून काटेकोर तपासणी करण्यात आल्यानंतर संबंधित प्रवाशांना काॅरन्टाईनचा शिक्का मारून आगमनाच्या दिवसापासून 14 दिवसासाठी घरगुती विलगीकरणासाठी जाण्यास अनुमती असणार आहे. राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण खाते आणि वैद्यकीय शिक्षण खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव जुनेद अख्तर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे कळविले आहे.