कर्नाटक राज्यात खाजगी वाहनातून आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यापुढे कोणतीही आरोग्य तपासणी केली जाणार नाही. पर्यायाने यासंदर्भात लॉक डाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी दि. 18 ते 31 मेपर्यंत जारी करण्यात आलेला आदेश मागे घेण्यात आला आहे.
राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे आयुक्त पंकजकुमार पांडे यांनी यासंदर्भात सुधारित परिपत्रक राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक वाहतूक विभागांना धाडले आहे. आर्थिक उपक्रम आणि प्रवासी वाहतूक यामध्ये अधिक शिथीलता यावी यासाठी आंतरजिल्हा वर्दळीवरील निर्बंधात सरकारने सुधारणा केली आहे. तेंव्हा आता यापुढे प्रवाशांच्या आरोग्य तपासणीसाठी असणारे राज्यातील आंतरजिल्हा तपासणी नाके हटविण्यात यावेत.
सार्वजनिक वाहतुक (बसेस आणि रेल्वे) सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची प्रवासाच्या आरंभाच्या ठिकाणी आरोग्य तपासणी केली जाईल. यावेळी जे प्रवासी तंदुरूस्त आरोग्यपूर्ण असतील त्यांना प्रवासात परवानगी दिली जाईल. मात्र ज्या प्रवाशांमध्ये आजाराची लक्षणे आढळतील त्यांना फिव्हर क्लिनिकमध्ये पुढील तपासणीसाठी पाठविले जाईल.
ज्या संस्था अथवा कंपन्या सार्वजनिक वाहतूक करतात (केएसआरटीसी व इतर, भारतीय रेल्वे, खासगी बस वाहतूकदार) त्यांनी आपल्या प्रवाशांची प्रवासाला प्रारंभ करण्यापूर्वीच आरोग्य तपासणी करणे गरजेचे असणार आहे. राज्यात खाजगी वाहनाने आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यापुढे कोणतीही आरोग्य तपासणी केली जाणार नाही, असे आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे आयुक्त पंकजकुमार पांडे यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.