1 जुन हुतात्मा दिन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. अनिल हेगडे आणि सहकारी हिंडलगा यांनी शुक्रवारी ही स्वच्छता मोहीम राबविली.
हुतात्मा दिन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने बॉक्साइट रोड, हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक परिसरात स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आली आहेत. अनिल हेगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी स्मारक परिसरातील झाडे-झुडपे आणि कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली.
हुतात्मा स्मारक परिसराच्या स्वच्छतेसह येत्या दोन दिवसात इतर आवश्यक कामे पूर्ण केली जाणार आहेत. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीसह बेळगाव तालुका म. ए. समिती, खानापूर तालुका म. ए. समिती आणि म. ए. युवा समितीतर्फे हुतात्मा दिन अभिवादन कार्यक्रमास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
1 जून हुतात्मा दिनाबाबत सोशल मिडियावरून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असून हुतात्म्यांचे बलिदान आठवा आणि सीमा प्रश्नासाठी कटिबद्ध व्हा, असे आवाहन युवावर्गाकडून केले जात आहे. व्हाट्सअप, फेसबुक आदींवर हुतात्मा दिनाबाबत जनजागृती सुरू आहे.
1 जून हुतात्मा दिन कार्यक्रमासाठी म. ए. समितीचे आवाहन
सीमाभागामध्ये कर्नाटक सरकारने 1 जून 1986 साली कन्नड सक्ती लागू केली. त्यामुळे सीमाभागात अभूतपूर्व आंदोलन देण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबारात 9 हुतात्मे धारातीर्थी पडले होते. या हुतात्म्यांना येत्या सोमवार दि. 1 जून 2020 रोजी सकाळी 8 वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. यासाठी सर्वांनी हुतात्मा स्मारक बॉक्साइट रोड हिंडलगा येथे मोठ्या संख्येने हजर रहावे, असे आवाहन बेळगाव शहर म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
1 जून 1986 रोजी कर्नाटक सरकारने संपूर्ण सीमाभागात कन्नड सक्ती लागू करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे कन्नड सक्ती विरोधात सीमाभागात संतापाची लाट उसळली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनानुसार आंदोलन सुरू असताना कर्नाटकी पोलिसांनी अत्याचाराची परिसीमा गाठत बेछूट गोळीबार केला होता. यामध्ये 9 जणांनी हौतात्म्य पत्करले. त्यांचे हौतात्म्य वाया जाऊ नये याची दखल मराठी भाषिकांनी घेत, सीमावासीयांनी मराठी भाषेचे संस्कृतीचे रक्षण करताना प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा दिन कार्यक्रमाला उपस्थित राहताना सरकारने घालून दिलेल्या नियमाचे पालन करत मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतर राखून गांभीर्याने हुतात्मा दिन पाळावा, असे आवाहन शहर म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे आदींनी केले आहे. शहर समिती बरोबरच बेळगाव तालुका म. ए. समिती, खानापूर तालुका समिती, म. ए. युवा समिती आदींनी देखील हुतात्मा अभिवादनासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.