काँग्रेस रोडवर दुसऱ्या रेल्वे गेटनजीक दुभाजकाला लागून रस्त्यावर टाकण्यात आलेला रहदारीला धोकादायक ठरणारा पाण्याच्या पाईपचा ढिगारा माजी महापौर व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांच्या पुढाकाराने हटविण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.
काँग्रेस रोड येथे स्मार्ट सिटी अंतर्गत गटार बांधकामाबरोबरच जलवाहिनी घालण्याचे काम सुरू आहे. यासाठी दुसऱ्या रेल्वे गेट येथील मारुती मंदिर समोरील पहिला रेल्वे गेटकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. या रस्त्यावर गटार व जलवाहिनीच्या बांधकामाचे साहित्य ठेवण्यात येत होते. हा रस्ता गुरुवारपासून खुला करण्यात आला असला तरी रस्त्याच्या दुभाजकाला लागून टाकण्यात आलेला पाण्याच्या पाईप्सचा ढिगारा तसाच पडून होता. यापैकी काही पाईप रस्त्यावरही विखुरले होते. ज्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
![Ex mayor vijay more](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/05/FB_IMG_1590749191469.jpg)
आज शुक्रवारी सकाळी शांताई वृद्धाश्रमातील आपले काम आटोपून आपला मुलगा अॅलन यांच्यासमवेत परत येणाऱ्या माजी महापौर विजय मोरे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी लागलीच आपली गाडी थांबवून प्रथम रस्त्यावरील धोकादायक पाईपचा ढिगारा तेथील रहदारी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला.
त्यानंतर त्यांनी स्वतः स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने रस्त्यावरील सर्व पाईप उचलून कडेला नेऊन ठेवले. परिणामी वाहतूक सुरळीत झाल्यामुळे वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत होते. रस्त्यावरील धोकादायक पाण्याचे पाईप हटविण्यासाठी आपल्याला स्थानिक कार्यकर्त्यांसह टिळकवाडी पोलीस स्थानकाचे एएसआय सुभाष बेळसकर व रहदारी पोलिसांचे सहकार्य लाभल्याचे विजय मोरे यांनी “बेळगाव लाईव्ह”ला सांगितले