संपूर्ण देश कोरोना सारख्या महामारीमुळे हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. पाचव्या टप्प्यातील लॉक डाऊनमध्ये कांही शिथिलता देण्यात आली असली तरी कोरोनाचा धोका कायम आहे. ही वस्तुस्थिती असताना कांही महाभाग कोरोनाच्या संकटाचा विचार न करता ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येत असल्यामुळे हा एक चर्चेचा विषय झाला आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ग्रामपंचायत निवडणूक पुढे ढकलली आहे. मात्र अजूनही कांही मंडळींना ग्रामपंचायत निवडणूक लवकरच होईल, अशी आशा लागून राहिली आहे. परिणामी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, काहीं अतिउत्साही इच्छुक उमेदवारांनी तर रंगीत ओल्या पार्ट्या देण्यास सुरुवात केली आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता अजूनतरी कांही महिने ही निवडणूक होणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत. कांहीजण राज्य सरकार ही निवडणूक तातडीने घेईल असे सांगत आहेत. आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक तातडीने घेण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात ही निवडणूक आणखी दोन महिने तरी होणार नाही हेही तितकेच खरे आहे.
सध्या देशातील लॉक डाऊन 30 जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. तेंव्हा सध्या तरी ही निवडणूक होण्याची शक्यता नाही. मात्र अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे अनेकांचा ओल्या पार्ट्या देण्याकडे कल वाढला आहे. त्याचप्रमाणे अनेक जण आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यासाठी सज्ज झाले. यासर्व प्रकारांमुळे सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या चर्चेला उधान आल्याचे चित्र पहावयास मिळतात आहे.