पूर्वीची अंगणातील लग्ने परत वास्तवात आली आहेत. लेकनं अंगण ओलांडून सासरी जाताना, या घराने आणि अंगणाने तिला निरोप द्यावा ही लग्नाची मूळ व्याख्या.श्रीमंती डामडौलाने लोक लग्न करण्याच्या हव्यासापायी, लोकं अमाप खर्च करून लग्न करत होती. हजारो लोकांना बोलावणे पंक्तीच्या पंक्ती उठवणे, बँझो डॉल्बीचा दणदणाटाने गल्ली थरारून उठली पाहिजे हा मनसुबा. लग्नाच्या पवित्रतेपेक्षा मोठेपणाचा आवच मोठा होता.
हजारो लोकांच्या गर्दीत पवित्र बंधनात बांधले जाणारे ते जीवच कुठे तरी हरवून जायचे. लग्नात केले जाणारे रुसवेफुगवे, मानपान, रोषणाई, बँड आणि फटाक्यांची आतषबाजी दारू पिऊन वरातीतील हिडीस नृत्य ही लग्नाची काही दिवसांपूर्वीची व्याख्या. कोरोनाने हे सगळं चित्रच पालटवल.
सजलेली नवरा नवरी,मोजकेच असे 50 नातेवाईक, दारात टाकलेला मंडप आणि घराच्या साक्षीने होणारे लग्न. हा मंगलमय सोहळा, दाराचा उंबरा लेकीला आशीर्वाद देत पाठवणी करत आहें, दारात बहरलेला आंबा वधू वरावर चवरी ढाळत आहे हे मंगलमय दृश्य आजच्या लग्नाचे!
रविवारी लॉक डाऊन होता. या काळात शहरात अनेक विवाह झाले. त्यात नवरा नवरीनेआणि वऱ्हाडीने मास्क परिधान केलेले, हँड सॅनिटायजरचा वापर,पाळले जाणारे सोशल डिस्टन्स.बडेजावा पेक्षा विधीला महत्व दिले जात होते. गर्दी पेक्षा दर्दी आपल्या हृदयाची माणसे लग्नात उपस्थित होती.खर्चाला फाटा, वाचलेल्या नोटा आणि वधू वरानी एकमेकांना हारा सोबत घातलेले मास्क हे दृश्य देखील नवीनच होते.
वाईटात चांगली गोष्ट म्हणजे अमाप खर्च करून हाताशी येणारी निराशा यातून टाळली गेली लग्नें कशी आदर्श करावी त्याची एक नवीन ओळख लोकांना झाली. इथून पुढं लग्नात कायमचीच अधिकतम 50 माणसांची हजेरी हा नियम करण्यास हरकत नाही.महत्व विधीला आहे गर्दीला नाही. पैसा ही राष्ट्रीय संपत्ती आहे तो वाचवलाच पाहिजे.