ग्रामपंचायतींमध्ये दक्षता घ्या बेळगाव तालुक्यात परराज्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून त्यांच्यावर नजर ठेवण्यात सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि तालुका पंचायत सदस्यांनी लक्ष दिले पाहिजे, असे मत तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी व्यक्त केले आहे.
तालुका पंचायत सभागृहात नुकतीच झालेल्या बैठकीत त्यांनी वरील विचार व्यक्त केले आहेत. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचायत अध्यक्ष शंकरगौडा पाटील, उपाध्यक्ष मारुती सनदी व्यासपीठावर उपस्थित होते. मागील दोन महिन्यांपासून कोरोना बाधितांमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याच दरम्यान ग्रामपंचायत निवडणूक ही पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र आता तालुक्यात परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे.
त्यामुळे त्यांना क्वॉरटाइन ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. चौदा दिवस विविध संस्था तसेच शाळांमध्ये ठेवण्यात आले आहे. 14 दिवस झाल्यानंतर त्यांचे सर्व तपासणी अहवालासाठी पाठवण्यात येणार आहेत. हा अहवाल आल्यानंतर जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यांना सिव्हील हॉस्पीटलमध्ये हलवण्यात येणार आहे तर निगेटिव्ह रुग्णांना घरी पाठविण्यात येणार आहे.
मात्र यासाठी आता तालुका पंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये आम्ही लक्ष ठेवून आहोत. याचबरोबर नागरिकांच्या समस्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या. यावेळी सुनील अष्टेकर, नीरा काकतकर, नारायण नलवडे, काशिनाथ धर्मोजी, आप्पासाहेब कीर्तने, भीमा नाईक, निलेश चंदगडकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.