संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी गुडशेडरोड, शास्त्रीनगर, एसपीएम रोड, कपिलेश्वर कॉलनी मार्गे बळ्ळारी नाल्याला मिळालेल्या नाल्यातील गाळ पावसाळ्यापुर्वी काढण्याची जोरदार मागणी शास्त्रीनगरवासियांनी केली आहे.
शास्त्रीनगरवासियांतर्फे सदर मागणीचे निवेदन नुकतेच महापालिका उपायुक्त लक्ष्मी निप्पाणीकर यांना सादर करण्यात आले आहे. गुडशेडरोड, शास्त्रीनगर क्राॕस 2 ते अपूर्वा हाॕस्पीटल मागून जाऊन एसपीएम रोड, कपिलेश्वर कॉलनी मार्गे पुढे धारवाड रोड येथे बळ्ळारी नाल्याला मिळालेल्या नाल्यातील गाळ पावसाळ्यापुर्वी काढणे अत्यंत गरजेचे आहे.
अन्यथा मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील या नाल्यातील पाणी आसपासच्या घरांमध्ये घुसून नुकसान होण्याची शक्यता आहे. तेंव्हा बेळगाव महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकमेकाच्या समन्वयाने तातडीने पावले उचलावीत. सदर नाल्यातील गाळ आणि केरकचरा तात्काळ काढून टाकावा, जेणेकरून पावसाळ्यात पाणी तुंबून पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही.
नाल्यातील गाळ काढल्यानंतर त्याचे ढिगारे काठावर रस्त्याकडेला न ठेवता त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जावी. याबरोबरच नाल्याशेजारील अतीक्रमणे हटवून नाल्याचे बफर झोनही स्वच्छ करुन नाल्याचे पात्र पूर्वीसारखे रुंद करुन नाला दोन्हीबाजूनी बांधून घ्यावा. जेणेकरुन दरवर्षी प्रशासनाचा नालारुंदीकरणासाठीचा खर्च वाचेल व पूर परिस्थितीची डोकेदुखीही थांबेल, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. महानगरपालीका उपायुक्त लक्ष्मी निप्पाणीकर यांना निवेदन सादर करतेवेळी शास्त्रीनगरवासीयांतर्फे माई पाटील, राहुल पाटील, शेखर वाईंगडे, पवन जूवेकर, दिपक मालवदे, अमृत यलजी, कांबळे मँडम आदी उपस्थित होते.