बेळगाव हे एक प्रमुख व्यावसायिक केंद्र असून याठिकाणी देशभरातील बहुसंख्य स्थलांतरित श्रमिक कामगार कामास आहेत या सर्वांच्या सोयीसाठी बेळगाव येथून दोन “स्पेशल वन स्टॉप श्रमिक ट्रेन्स” अर्थात श्रमिक रेल्वेगाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी सिटीझन कौन्सिल बेळगांवने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सिटीझन कौन्सिल बेळगावचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन मंगळवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना सादर करण्यात आले. बेळगाव हे एक प्रमुख व्यावसायिक केंद्र असून देशाच्या विविध भागातील श्रमिक कामगार वर्ग याठिकाणी कामास आहे. राज्याची दुसरी राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावचा फौंड्री उद्योग देखील सुप्रसिद्ध आहे. उदरनिर्वाहासाठी बेळगावातील व्यवसाय आणि औद्योगिक क्षेत्राला देशभरातील स्थलांतरित श्रमिक कामगार पसंती देत असतात. येथील व्यापार आणि व्यवसाय देखील अनेक स्थलांतरित श्रमिक कामगारांवर अवलंबून आहे. तथापी कोरोना प्रादुर्भाव आणि लाॅक डाऊनमुळे गेल्या दीड महिन्यापासून बेळगावातील स्थलांतरित श्रमिक कामगारांची मोठी परवड होत आहे.
व्यापार, उद्योगधंदे, व्यवसाय सर्वकांही ठप्प असल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापैकी बहुतांश कामगारांकडील जीवनावश्यक साहित्यदेखील संपले असून त्यांना आता आपापल्या मूळ गावी जाण्याची ओढ लागली आहे. बेळगावात कामास असणाऱ्या स्थलांतरित श्रमिक कामगारांमध्ये उत्तर भारतीय बहुसंख्येने आहेत. त्यांना त्यांच्या मुळगावी जाण्यास सध्या कोणत्याच प्रवासी गाड्या उपलब्ध नाहीत. परिणामी या सर्वांचे हाल होत आहेत.
यासाठी बेळगाव ते जोधपूर व्हाया पुणे सुरत, वडोदरा, अहमदाबाद, मारवाड अशी एक स्पेशल वन स्टॉप श्रमिक ट्रेन अर्थात खास श्रमिक रेल्वेगाडी, त्याचप्रमाणे बेळगाव ते दिल्ली व्हाया पुणे खांडवा, इटारसी, भोपाळ, ग्वाल्हेर, झाशी, आग्रा केंट व मथुरा अशी दुसरी स्पेशल वन स्टॉप श्रमिक ट्रेन अर्थात खास श्रमिक रेल्वेगाडी सुरू करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
सदर निवेदनाचा स्वीकार करून केंद्र शासनाने सात राज्यांमधील आंतरराज्य प्रवासी रेल्वे वाहतुकीला परवानगी दिली आहे. तेव्हा बेळगाव येथून सदर श्रमिक रेल्वे गाड्या लवकरात लवकर सुरू करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन, असे ठोस आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दिले. निवेदन सादर करते वेळी सिटीझन कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्यासह शेवंतीलाल शाह, अरुण कुलकर्णी आदी उपस्थित होते.