हृदयविकाराने निधन झालेल्या मंड्या जिल्ह्यातील महिलेवर निपाणीनजीकच्या कोगनोळी चेक पोस्टजवळील दुधगंगेच्या तीरावर भडाग्नी देण्यात आला.
मंड्या येथील 35 वर्षीय सौम्या पुणे ( महाराष्ट्र ) येथे नोकरी करीत होती. दोन दिवसापूर्वी हृदय विकाराने तिचा मृत्यू झाला होता.
मंड्या जिल्ह्यातील मुद्दुरु या तिच्या गावी मृतदेहावर अंतीमसंस्कार संस्कार करण्यासाठी तिचा मृतदेह मंडयाला नेण्याचा निर्णय तिच्या कुटुंबीयांनी घेतला. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंड्या जिल्हा प्रशासनाने सौम्याचा मृतदेह मंडयाला आणण्यास परवानगी दिली नाही.
यामुळे तिचा मृतदेह निपाणी सीमेवर वाहनातच पडून राहिला.
या घटनेची माहिती मिळताच बेळगाव जिल्हा प्रशासन मदतीसाठी धावून गेले. बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख निंबरगी आणि चिकोडीचे ए सी रवींद्र करलिंगन्नवर हे रविवारी रात्री 12 च्या सुमारास कोगनोळीला धावले. त्यांनी सौम्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यानंतर चेक पोस्टनजिकच्या शासकीय गायरानावरील लाकडे गोळा करून तेथील दुधगंगा नदीच्या तीरावर सौम्याच्या मृतदेहावर अंतीमसंस्कार केले.
बेळगाव जिल्हा प्रशासनाने दाखविलेल्या या माणुसकीने सौम्या चे पती शरद आणि वडील अप्पय्या गहिवरले.
सौम्याचे वडील अप्पय्या हे निवृत्त फौजदार असल्याचे कळते. सौम्याच्या पश्च्यात पती शरद आणि 5 वर्षीय मुलगी श्वेता असा परिवार आहे.