गोवा सरकारने बेळगावसह कर्नाटकातील पोल्ट्री उत्पादनांना आपल्या राज्यात बंदी घातल्यामुळे कोरोना आणि लॉक डाऊनच्या संकटामुळे आधीच अडचणीत आलेल्या बेळगाव शहरासह जिल्ह्यातील पोल्ट्री चालकांची मोठी पंचाईत झाली आहे. परिणामी गोवा सरकारने आपला बंदीचा आदेश तात्काळ मागे घ्यावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
कोरोना प्रादुर्भावाचा संकटामुळे अभूतपूर्व आणि असामान्य प्रदीर्घ मंदीचा फटका बसलेल्या जळगाव शहर आणि जिल्ह्यातील पोल्ट्री चालकांना जून महिन्याच्या प्रारंभी नव्या ताजा पक्ष्यांची (कोंबड्या) अपेक्षा आहे. बेळगावसह कर्नाटकातील पोल्ट्री उत्पादनांना गोवा राज्यात बंदी घालण्यात आली आहे. नवे पक्षी तयार होणार असल्यामुळे ही बंदी उठवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी गोवा सरकारचे मन वळवावे अशी पोल्ट्री चालकांची इच्छा आहे. यासंदर्भात समस्त पोल्ट्री चालक आणि या क्षेत्रातील मंडळींच्यावतीने पोल्ट्री खाद्य व उत्पादन क्षेत्रातील उद्योजक क्वालिटी प्रॉडक्ट प्रा. लि.चे अजित लोकूर यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना शुक्रवारी एक पत्र दिले आहे.
गोवा राज्यासाठी प्रमुख पोल्ट्री उत्पादन पुरवठादार असणाऱ्या बेळगावातून गोव्याला सुमारे 20 हजार पक्षी (कोंबड्या) आणि मोठ्या प्रमाणात अंडी पाठवली जातात. पोल्ट्री उत्पादनाच्या बाबतीत बेळगाव परिसराची कांहीही तक्रार नाही. परंतु स्वतःच्या आणि पोल्ट्री चालकांच्या हितासाठी गोवा सरकारने कर्नाटकातील पोल्ट्री उत्पादनांवर घातलेली बंदी मागे घ्यावी अशी पोल्ट्री चालकांची मागणी आहे. गेल्या मार्च महिन्यात दावणगिरी आणि म्हैसूर जिल्ह्यातील पोल्ट्री फार्मस् मध्ये “एव्हीआन इन्फ्लूएंझा” या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कर्नाटकातील पोल्ट्री उत्पादनांना गोवा राज्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
यासंदर्भात कर्नाटक राज्य पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन खात्याचे सचिव ए. बी. इब्राहीम यांनी गेल्या 13 एप्रिल रोजी गोवा सरकारला एका पत्राद्वारे रोगाचा प्रादुर्भाव झालेले क्षेत्र गोव्याच्या सीमेपासून खूप दूर आहे आणि एव्हीआन इन्फ्लूएंझा प्राथमिक भावाला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आले आहेत, असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यानंतर बेळगाव पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा खात्याचे उपसंचालकांनी देखील गेल्या 15 मे रोजी बेळगाव शहरासह जिल्ह्यात एव्हीआन इन्फ्लूएंझाचा कोणताही प्रादुर्भाव नाही. त्यामुळे इतर राज्यात येथील पोल्ट्री उत्पादनांची वाहतूक करण्यास परवानगी दिली जावी, असे स्पष्ट केले असल्याचे अजित लोकूर यांनी मंत्री सुरेश अंगडी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
राज्यातील वरिष्ठ जबाबदार पशु संवर्धन व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोल्ट्री उत्पादनाची हमी देऊन देखील गोवा सरकारने अद्याप कर्नाटकातील पोल्ट्री उत्पादनांवरील आपला बंदी आदेश मागे घेतलेला नाही. बेळगावसह हुबळी येथील पोल्ट्री व्यवसाय प्रामुख्याने गोव्यातील ग्राहकांवर अवलंबून आहे. मात्र सध्या गोवा राज्यातील बंदीमुळे त्यांच्या व्यवसायावर मोठा प्रतिकूल परिणाम झाला आहे. यासाठी या प्रकरणी जातीने लक्ष घालून गोव्यातील कर्नाटकच्या पोल्ट्री उत्पादनांवरील बंदी तात्काळ मागे घेतली जाईल यादृष्टीने आपण क्रम घ्यावेत, अशी मागणीही अजित लोकूर यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.