लॉक डाऊनमुळे बेळगावसह देशभरातील पासपोर्ट कार्यालये गेल्या 50 दिवसांपासून बंद असून येत्या 17 मे पर्यंत तरी ती बंदच राहणार आहेत. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचनेनुसार ही कार्यालय सुरू होतील. यामुळे लॉक डाऊनपूर्वी पासपोर्टसाठी केलेले अनेकांचे ऑनलाईन अर्ज कोणत्याही कार्यवाही विना अडकून पडले आहेत.
लॉक डाऊनमुळे गेल्या 50 दिवसांपासून देशातील सर्व पासपोर्ट कार्यालय बंद आहेत. येत्या 17 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील लॉक डाऊन समाप्त झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचनेनुसार ही कार्यालय पुन्हा सुरू केली जाणार आहेत. लॉक डाऊनपूर्वी बेळगाव येथील कार्यालयात बऱ्याच जणांचे पासपोर्टसाठीचे अर्ज स्वीकारले गेले होते. आता लॉक डाऊन हटल्यानंतर हे अर्ज रिशेड्यूल्ड करणे गरजेचे आहे. ते रिशेड्यूल्ड केल्यानंतर संबंधितांना कागदपत्रे सादर करण्यासाठी नवीन तारीख मिळणार आहे.
बेळगाव शहरातील मुख्य टपाल कचेरीच्या दुसऱ्या मजल्यावर 14 फेब्रुवारी 2018 रोजी पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात आले. गेल्या दोन वर्षे तीन महिन्याच्या कालावधीत या कार्यालयांतर्गत 23 हजारहून अधिक पासपोर्ट बनविण्यात आले आहेत. पासपोर्ट साठी प्रारंभी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यानंतर कागदपत्रे जमा करण्यासाठी तारीख दिली जाते, त्यावेळीच बायोमेट्रिक केले जाते. पासपोर्ट काढण्यासाठी 1500 रुपये ऑनलाइन शुल्क आहे.
लॉक डाऊनपूर्वी बेळगाव कार्यालयात 70 जणांचे पासपोर्टचे अर्ज स्वीकारले जात होते. त्यामुळे आता लॉक डाऊन समाप्तीनंतर हे कार्यालय खुले झाल्यास येथे रोज 100 हून अधिक जणांची गर्दी होण्याची शक्यता आहे. बेळगाव पासपोर्ट कार्यालय लहान असल्याने येथे सोशल डिस्टन्सिंग राखणे कठीण जाणार आहे. इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत बेळगाव शहरात फक्त 70 जणांच्या पासपोर्टसाठीच्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. याउलट हुबळी येथे 400 तर बेंगलोर शहरात तब्बल 1 हजार 200 जणांच्या अर्जांची तपासणी केली जाते.