कोरोना महामारीमुळे अन्य क्षेत्रांप्रमाणे प्रिंटिंग क्षेत्रालाचेही नुकसान झाले आहे. केंद्र सरकारकडून अनेक क्षेत्रांना जशी मदत देण्यात आली, तशी मदत प्रिंटिंग व्यवसायिकांनाही दिली जावी, अशी मागणी बेळगाव प्रिंटर्स असोसिएशन ग्राफिक डिझायनर्स अँड ऑफसेट प्रिंटर्स संघटनेने केली आहे.
बेळगाव प्रिंटर्स असोसिएशन ग्राफिक डिझायनर्स अँड ऑफसेट प्रिंटर्स संघटनेतर्फे अध्यक्ष फारुख एम. गौस काकती यांच्या नेतृत्वाखाली सदर मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. गेल्या 2019 साली महापुरामुळे तीन-चार महिने मिनी ऑफसेट प्रिंटिंग, स्क्रीन प्रिंटींग, डिझायनिंग आणि बाइंडिंग व्यवसाय बुडाला होता. आता गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना महामारी सुरू झाल्यामुळे प्रिंटिंग व्यवसाय पुन्हा बंद पडला आहे.
जिल्ह्यात सुमारे 200 प्रिंटिंग प्रेस चालक आहेत. आता कोरोना आणि लॉक डाऊनमुळे पुन्हा हा व्यवसाय बंद पडला आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाचा लग्नसराईचा मोठा हंगाम रिकामा गेल्यामुळे मिनी ऑफसेट प्रिंटिंग, स्क्रीन प्रिंटींग, डिझायनिंग आणि बाइंडिंग व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. लागोपाठ दोन वर्षे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाल्यामुळे आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न त्यांना पडला आहे. केंद्र शासनाकडून सध्या विविध उद्योगधंद्यांना मदत केली जात आहे. त्याप्रमाणे मिनी ऑफसेट प्रिंटिंग, स्क्रीन प्रिंटींग, डिझायनिंग आणि बाइंडिंग क्षेत्रातील लोकांनाही सरकारने मदत करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी एल. आय. पाटील, हर्षवर्धन कालकुंद्रीकर, पुंडलिक पाटील, संदीप भगत, इरण्णा लाली, प्रदीप पारीख, ज्योतिबा झेंडे, महेश चौगुले, दत्तात्रेय माने, सागर हाजगोळकर, नितेश तोमुतकर, राजू जांगळे आदी उपस्थित होते. आपल्या असोसिएशनच्या मागणीसंदर्भात “बेळगाव लाईव्ह”ला माहिती देताना दर्शन ऑफसेट प्रिंटर्सचे मालक एल. आय. पाटील म्हणाले की, मागील वर्षी पूर परिस्थितीमुळे आणि आता लॉक डाऊनमुळे अम्मा आम्हा प्रिंटिंग व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून आम्ही सर्वजण हवालदिल झालो आहोत. यंदाचा लग्नसराईचा मोठा सिझन रिकामा गेल्यामुळे प्रत्येक वेळेस मालकाचा 2 – 2 लाख रुपयांचा निव्वळ नफा बुडाला आहे. ऑफसेट प्रिंटिंग, स्क्रीन प्रिंटींग, डिझायनिंग आणि बाइंडिंग क्षेत्रात दरवर्षी लाखोंची उलाढाल होत असते. मात्र बेळगाव जिल्ह्यातील या व्यावसायिकांवर सलग दोन वर्षे आर्थिक संकट कोसळले आहे. तेंव्हा केंद्र सरकारने इतर उद्योगधंद्यांना ज्याप्रमाणे मदत केली आहे. त्याप्रमाणे आमच्या व्यवसायाला देखील मदत करावी अशी आमची मागणी आहे, असे पाटील यांनी सांगितले.