शहरातील बापट गल्ली येथील रस्त्यावर पडलेल्या 50 व 10 रुपये अशा दोन चलनी नोटा कोरोनाच्या भीतीने पोलिसांनी जाळून टाकण्यास सांगितल्याची घटना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. तथापि नोटा जाळून टाकण्याच्या पोलिसांच्या या अजब सल्ल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत होते.
याबाबतची माहिती अशी की, बापट गल्ली कॉर्नरवरील चहाच्या गाडीनजीक रस्त्यावर 50 व 10 रुपयाची प्रत्येकी एक नोट रस्त्याकडेला पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सदर नोटा पाहण्यासाठी गल्लीतील नागरिकांची गर्दी झाली. यावेळी बापट गल्लीतील कालिकादेवी युवक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते. त्यांनी नागरिकांना नोटांपासून दूर राहण्यास सांगून खडेबाजार पोलिसांना घटनेची माहिती दिली.
तेंव्हा चार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन त्या बेवारस नोटा जाळून टाकण्यास सांगितले. तेंव्हा उपस्थितांनी नोटा जाळून का टाकता पैसे म्हणजे लक्ष्मी असते असे सांगून नोटा जाळण्याऐवजी सॅनीटायझरने निर्जंतुक करा असा सल्ला दिला.
तेंव्हा पोलिसांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाकडे उपस्थितांचे लक्ष वेधून आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही तेंव्हा त्या नोटा जाळून टाका असा उलट सल्ला नागरिकांना दिला. परिणामी सॅनीटाईझ करण्याऐवजी नाईलाजाने त्या नोटा जाळून टाकण्यात आल्या. सदर नोटा जाळण्याऐवजी सॅनीटाईझ करून एखाद्या गरिबाला दान केल्या असत्या तर बरे झाले असते असे मत उपस्थितांमध्ये व्यक्त होताना दिसत होते.