एपीएमसी भाजी मार्केट मध्ये होत असलेली गर्दी पाहून एपीएमसी प्रशासनाने नागरिकांना शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना सोयीचे ठरावे यासाठी शहरातील बाहेरील मार्गावर अनेक ठिकाणी भाजी मार्केट स्थापन केले. यामुळे प्रत्येकाची सोय झाली असली तरी संबंधित ठिकाणचा कचरा वेळेवर उचलला जात नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
ऑटो नगर येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भाजी मार्केट केंद्राच्या ठिकाणी मागील तीन दिवसांपासून कचरा उचल झाली नसल्याचे दिसून येत आहे. मात्र याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देणेही टाळले आहे. याचा विचार करून येथील कचरा उचल करावा अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
लॉक डाऊन काळात कोणतीही गर्दी होऊ नये यासाठी एपीएमसी भाजी मार्केटमधील प्रशासनाने शहराच्या तीन ठिकाणी भाजीमार्केट केंद्र सुरू केले आहे. मात्र या ठिकाणचा कचरा बाहेर काढण्यासाठी दुर्लक्ष करण्यात येत असल्याने मोठी समस्या होत आहे. हा जर कचरा तसाच पडून राहिला तर अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यामुळे कचरा तातडीने काढण्याची गरज व्यक्त होत आहे.
लॉक डाऊन मुळे अनेकजण घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.मात्र काही घरगुती साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांना योग्य वेळ देण्यात आली आहे त्याच वेळेत भाजी खरेदी व इतर साहित्य खरेदी करण्यात येत आहे. मात्र ऑटोनगर येथील भाजी मार्केटमध्ये कचरा असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
सध्या कोरोना सारख्या आजाराने ग्रासलेल्या नागरिकांना स्वच्छतेची गरज असताना भाजी मार्केटमध्ये कचरा असलेल्यामुळे समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ऑटोनगर येथील भाजी मार्केट स्वच्छ करावी अशी मागणी होत आहे.