कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर निपाणी पोलिसांनी पकडलेल्या सुमारे 140 स्थलांतरित राजस्थानी कामगारांचे बुधवारी वंटमुरी येथील महालिंगेश्वरी वस्तीगृहात विलगीकरण (इसोलेशन) करण्यात आले. याप्रसंगी संबंधित कामगारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने माजी महापौर विजय मोरे यांनी त्यांना चांगलाच सज्जड दम दिला.
याबाबतची अधिक माहिती अशी की, प्राणघातक करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक राज्यात नागरिकांसह कामगारांच्या स्थलांतरावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करून आपल्या गावी राजस्थानकडे निघालेल्या 140 कामगारांना निपाणी पोलिसांनी सुतकट्टी घाटात अडवून त्यांना वाहनातून वंटमुरी बेळगाव येथील महालिंगेश्वरी वस्तीगृहात आणले. याठिकाणी संबंधित कामगारांचे विलगीकरण करण्यात आल्यानंतर त्यांना सकाळचा नाश्त, जेवणखाण, पाणी आदी सर्व मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून सर्वती काळजी घेतली जात असताना बुधवारी सदर स्थलांतरित कामगारांनी गोंधळ घालून महालिंगेश्वरी वस्तीगृहातील साहित्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तसेच आम्हाला आताच्या आता आमच्या गावी जाऊ द्या, येथील जेवण बरोबर नाही, आम्हाला राजस्थानी टाईपचेच जेवण द्या आदी अवास्तव मागण्या करण्यास सुरुवात केली.
हा प्रकार कानावर येताच माजी महापौर व सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे महापालिकेकडून सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतानाही गोंधळ घालणाऱ्या कामगारांना चांगले धारेवर धरून सज्जड दम दिला. तसेच अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. विजय मोरे यांचा रुद्रावतार पाहून संबंधित कामगार चिडीचूप झाले. याप्रसंगी बेळगाव महापालिकेचे अधिकारी, राजस्थानी मंडळाचे पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.