ग्रामीण भागात कोरोनाची धास्ती वाढत चालली असून अनेक गावांत कटबंद वार पाळले जात आहेत. बेळगाव तालुक्यातील विशेषतः पश्चिम भागातील अनेक गावे वार पाळत आहेत.
उचगाव भागात देखील कोरोनाची धास्ती वाढत असल्याने अनेक गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत या कोरोना विरोधात लढा देण्यासाठी तालुक्यात अनेक गावांनी वार पाळणूक सुरु ठेवली आहे. उचगाव येथील जागृत देवस्थान मळेकरणी देवीचे वार सोमवार पासून पाळण्यात येत आहेत.
सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस वार पाळणूक राहणार आहे. त्यामुळे गावात कोणत्याही व्यक्तीला प्रवेश मिळणार नाही तर गावातील व्यक्तीनेही बाहेर जाऊ नये असे आवाहन देवस्थान पंचकमिटी आणि ग्रामपंचायतीने केले आहे.
देवस्थान पंच कमिटीने गावातील सर्व सीमा बांधल्या आहेत. हे वार कडक पळावेत असे आवाहनही करण्यात आले आहेत. सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे वार पाळण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.
बाची गावात दोन दिवस कटबंद वार..
बेळगाव जवळ महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या बाची गावात सोमवारी 20 व मंगळवारी 21 एप्रिल रोजी दोन दिवस कटबंद वार पाळण्यात येणार आहेत. केवळ गावातच नव्हे तर एकमेकांच्या घरी देखील कुणी जाऊ नये दोन दिवस
गावातील नागरिकांनी कोणी बाहेर जाऊ नये, बाहेरून कोणी गावांमध्ये येऊ नये, नातेवाईक असो कुणीही असो, दोन दिवस गाव पूर्णपणे बंद राहील, हि खबरदारी संपूर्ण जनतेने घ्यावी असे आवाहन पंच मंडळींनी केलं आहे. 19/04/2020 रोजी गावामध्य देवस्की पंच मंडळी, व गावचे नागरिक यांची बैठक झाली घेऊन दोन दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.