बेळगाव शहर आणि परिसरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने बेळगाव शहर बंद ठेवण्याचा आदेश जाहीर करण्यात आला आहे. या परिस्थितीत एपीएमसी आणि नव्याने सुरू करण्यात आलेल्या दोन भाजी मार्केट सुरू ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. नागरिकांसाठी सोयीचे ठरणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हाधिकारी डॉक्टर एस बी बोमनहळी यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बी एस येडीयुरप्पा रोड वरील मालिनी सिटी येथे तात्पुरता सुरू असलेले व्होलसेल भाजी मार्केट चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी घेतला आहे. मात्र इतर दोन ठिकाणी असलेले भाजी मार्केट सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
आगामी चार दिवस शेतकऱ्यांनी शेतीतील कच्चा माल किंवा भाजी ऑटो नगर किंवा इंडालको येथील भाजीमार्केट मध्ये घेऊन जावीत असे आवाहन देखील करण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी झालेल्या वादळी पावसाने मालिनी सिटी येथील तात्पुरता बनवलेले शेड कोसळले आहेत. या घटनेत दोघे जण जखमी देखील झाले आहेत. मालिनी सिटी परिसरात चिखल आणि पत्रे उडून गेल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे हे मार्केट चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बेळगाव शहर परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने आता पूर्णतः बंद करण्यात आले आहे. या परिस्थितीत नागरिकांना मोठे त्रास सहन करावे लागणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मालिनी सिटीत तात्पुरता गाळे घेतलेल्या व्यापाऱ्यांनी ए पी एम सी मार्केट यार्डात व्यापार करायला परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. मात्र याबाबत एपीएमसी अध्यक्ष आनंद पाटील यांना विचारले असता बी एस येडीयुराप्पा मार्गावरील भाजी मार्केट चार दिवस बंद असणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर त्यांची इतरत्र सोय लवकरच करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.