आपटेकर गल्ली महाद्वार मेन रोड रस्त्याशेजारी शनिवारी सकाळी 200 रुपयांची एक बेवारस चलनी नोट पडलेली आढळून आल्यामुळे या परिसरात तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.
शहरातील वन टच फाऊंडेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल फोंडू पाटील याना आज शनिवारी सकाळी आपटेकर गल्ली महाद्वार मेन रोड रस्त्याशेजारी 200 रु.ची चलनी नोट आढळून आली. ती नोट पडलेली होती की, ठेवली होती हे समजू शकले नाही.
शिवाजी गार्डनच्या शेजारी शनिवारी भातकांडे स्कूलपर्यन्त भाजीविक्रेते भाजीपाला मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी घेऊन बसलेले होते. या रहदारीच्या रस्त्यावर पडलेली ती नोट अचानक एका गरिब व्यक्तीने उचलून घेतली.
तेंव्हा विठ्ठल पाटील यांनी त्वरित त्याला तसे करण्यापासून थांबविले. तसेच सोबत असलेल्या सॅनिटायझरद्वारे नोट उचलणाऱ्या त्या व्यक्तीचे हात आणि ती नोट निर्जंतुक केली. सध्या चलनी नोटांना थुंकी लावून कोरोना विषाणूचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर ही नोट सापडल्यामुळे तर्कवितर्क केले जात आहेत.