साखरेची पोती भरून महाराष्ट्रातून तामिळनाडूला निघालेल्या दोन ट्रकचा अपघात होऊन एक ठार झाला आहे.हिरेबागेवाडी येथे हा अपघात घडला.साखर भरून निघालेल्या या दोन ट्रक तामिळनाडूकडे निघाल्या होत्या.
एकाच ट्रान्सपोर्ट कंपनीच्या या दोन ट्रक हिरेबागेवाडी जवळ आल्या असताना मागील ट्रकने पुढील ट्रकला धडक दिली.त्यामुळे साखरेची पोती भरून नेणारे ट्रक रस्त्यावर उलटले आणि ट्रक मधील पोती रस्त्यावर पसरली.
काही साखरेची पोती फाटून साखर रस्त्यावर पसरली.या अपघातात एका ट्रकचा ४२ वर्षाचा क्लिनर ठार झाला.सध्या लॉक डाऊनमुळे महामार्गावर वाहतूक कमी आहे.त्यामुळे अपघात झाल्यावर जखमींना मदत मिळण्यास उशीर झाला.हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात अपघाताची नोंद झाली आहे.