बेळगाव शहरातील कोणीही उपाशी राहणार नाही असा माझा प्रयत्न असेल. तसेच जनतेने काही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क साधल्यास त्यांची अडचण दूर केली जाईल, असे आवाहन बेळगाव उत्तर चे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केले आहे.
शहरातील दानशूर व्यक्ती, संघ संस्था आणि दानी समाजाकडून केल्या गेलेल्या मदतीतून आमदार अॅड. अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारपासून बेळगाव उत्तर मतदारसंघातील गोरगरीब गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. महांतेश भवन, महांतेशनगर येथे गुरुवारी जीवनावश्यक वस्तू वाटप कार्यक्रमाप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार बेनके यांनी उपरोक्त आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, आमदार यानात्याने गेले 16 दिवस मी घरोघरी जाऊन दररोज सुमारे 3 हजार लोकांना पुलाव वाटप केले आहे. हा उपक्रम राबविताना काहींनी साहेब तुम्ही गरीब गरजूंची दुपारची जेवणाची व्यवस्था करत आहात पण रात्रीचे काय? तेंव्हा पुलाव वाटप करण्याऐवजी तुम्ही जीवनावश्यक साहित्य असलेल्या किटचे वाटप करा, असे सुचविले. ही सूचना पटल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यासाठी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
बेळगाव शहरातील पटेल समाज, मारवाडी समाज, सिंधी समाज,जैन दिगंबर समाज, मोबाईल असोसिएशन, महांतभवन, एपीएमसी मार्केट यार्ड व्यापारी रविवार पेठ येथील व्यापारी आदींनी सदर उपक्रमासाठी उस्फुर्त सहाय्य केले आहे यासह यातून सध्या महांतभवन येथे जीवनावश्यक साहित्य असलेली 2,500 किट्स सध्या तयार असून त्यांचे वाटप आज करण्यात आले. या पद्धतीने एकूण 12 हजार किट्सचे गोरगरीब गरजू लोकांमध्ये वाटप केले जाणार आहे. या किटमध्ये 1 किलो साखर, दीड किलो गव्हाचे पिठ, 1 किलो तेल, दोन पाकीट बिस्किट, तिखट, मीठ आदी एकूण 10 जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणार आहे अशी माहिती आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिली.
योग्य लाभार्थींची निवड करण्यासाठी बेळगाव उत्तर मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना पाठवून तेथील गरीब गरजू लोकांच्या नावांची यादी घेतली जाईल. त्यानंतर छाननी अंती संबंधित लाभार्थींना जीवनावश्यक वस्तूंचे कीट घरपोच दिले जाईल. कीट घेण्यासाठी संबंधित लोकांनी घराबाहेर पडण्याची देखील गरज नाही, असेही आमदार ॲड. अनिल बेनके यांनी स्पष्ट केले.